अभिमानास्पद ! शिवजयंतीच्या निमित्ताने ‘या’ देशाचा राजदूत करणार ‘मराठी’त भाषण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती साजरी होत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. दिल्ली होणाऱ्या या कार्यक्रमात 12 देशांचे राजदूत सहभागी होणार आहेत.

राजधानी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनमध्ये यावर्षी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. यासाठी 12 देशांचे राजदूत राजधानीत आले आहेत. यामध्ये बेल्गेरिया या देशाचे राजदूत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मराठीत गौरवोद्गार काढणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी नाशिक येथून ढोल पथक देखील दिल्लीत पोहचले आहे. त्याच बरोबर या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक तरुण दिल्लीत दाखल होत आहेत.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या अंगणामध्ये लेझीम पथक आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण होणार आहे. यासाठी हे सर्व कलाकार देखील दिल्लीत दाखल झाले आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या 12 देशांच्या राजदूतांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके भेट स्वरुपात देण्यात येणार आहेत. शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनाला सजविण्यात येत आहे. महाराष्ट्र सदनाच्या परिसरात रांगोळीही काढण्यात येणार आहे.

You might also like