बुलेटवाल्या ‘दादा’नों काळजी घ्या ! फक्त 20 सेकंदात गायब करत होते Bullet, पोलिस देखील परेशान

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या अनेक भागांतून बुलेट चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 64 गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यामधील 1 कोटी 30 हजार रुपये किमतीच्या 44 बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. ही टोळी केवळ 10-20 सेकंदात गाडीचे इग्नेशन (Ignition) तोडून नवीन बसवत आणि बुलेट घेऊन पसार होत होते. यासंदर्भात आता नवी मुंबई पोलीस आयुक्तालय थेट बुलेट कंपनीला गाडीच्या त्रुटीबाबत कळवणार आहे.

नवी मुंबई गुन्हे शाखेने तीन जणांना अटक केली आहे. सोहेल इम्तियाज शेख (वय-28), सौरभ मिलिंद करंजे (वय-23) अमोल ढोबळे (वय-35) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ढोबळे हा या टोळीचा सुत्रधार असून तोच बुलेटची चोरी करत होता. दरम्यान, अमोल ढोबळेच्या दोन साथिदारांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 13 बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यात देखील अमोल ढोबळे हाच मुख्य आरोपी आहे.

असा काढला आरोपींचा माग
मागील तीन ते चार महिन्यापासून बुलेट चोरी होण्याचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आल्यानंतर गुन्हे पोलीस आयुक्त डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमले. पथकाने बुलेट चोरीचा अभ्यास करुन सर्व घटनास्थळांना भेट देऊन तांत्रिक पुरावा गोळा केला. त्याच आधारे आरोपींचा माग घेत पोलीस आरोपींपर्यंत पोहचले.

वाशी येथून दोघांना अटक
तांत्रिक तपास करत असताना 22 जानेवारी रोजी आरोपी हे वाशी सेक्टर 17 येथे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांना समजली. त्यानुसार चार वेगवेगळी पथके तयार करुन सापळा रचण्यात आला. यावेळी सोहेल शेख व सौरभ करंजे यांना संशयास्पदरीत्या वावरताना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी बुलेट चोरीच्या उद्देशाने आल्याची कबुली दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मुख्य साथीदार अमोल ढोबळे याला महापे एमआयडीसी परिसरातून अटक केली. अमोल हाच टोळीचा मुख्य सूत्रधार असून त्याच्यावर यापूर्वी अहमदनगर, पुणे येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

बुलेटचीच चोरी का ?
अमोल ढोबळे हा गोव्याला गेला असता त्याच्याकडील पैसे संपले होते. त्यामुळे त्याने बुलेटची चोरी केली. सरळ आणि सोप्य पद्धतीने बुलेट चोरता येत असल्याने आणि ग्राहक सहजपणे मिळत असल्याने त्याने बुलेट चोरी करण्यास सुरुवात केली. अमोलने चोरलेल्या बुलेट विकण्यासाठी सोहेल आणि सौरभ याची मदत घेतली. या दोघांकडून गाडीचे बनावट पेपर बनवून घेऊन बुलेटची विक्री करत होता.

बुलेट चोरीसाठी इग्नेशन लॉकचा वापर
आरोपी अमोल हा बुलेट चोरी करण्यासाठी इग्नेशन लॉक 200 ते 300 रुपयात विकत घेत होता. चोरी करण्यासाठी निवडलेल्या बुलेटचे इग्नेशन ते इंजिन दरम्यान वायर तोडून नवीन इग्नेश लॉक बसवून बुलेट सुरु करत होता. बुलेट सुरु झाल्यानंतर बुलेट घेऊन पसार होत होता. इग्नेशन बदलण्यासाठी केवळ दहा ते वीस सेकंद लागत होते.

वाहन चालकांचा कंटाळा, आरोपींचा फायदा
सर्व दुचाकीमध्ये इग्नेशन आणि हॅण्डल लॉक एकाच ठिकाणी असते. मात्र, बुलेटमध्ये हॅण्डल लॉक हे हॅण्डलच्याखाली असते. त्यामुळे अनेकदा वाहन चालक हॅण्डल लॉक करण्याचा कंटाळा करतात. हाच कंटाळा आरोपींच्या पथ्यावर पडतो आणि गाडी चोरी होते. इग्नेशन लॉक बाजारात 200-300 रुपयांना सहज मिळते. चोरटे इग्नेशन लॉक लावून गाडी सुरु करुन सहजपणे घेऊन निघून जातात.

लॉक नसलेल्या बुलेटची चोरी
पोलिसांनी केलेल्या अभ्यासात ही बाब उघड झाली आहे की, ज्या बुलेट जप्त केल्या आहेत, त्यात एकाही वाहन चालकाने हॅण्डल लॉक लावलेले नव्हते. याचाच फायदा आरोपींनी घेतला. बुलेटच्या या त्रुटी बाबत थेट कंपनीला कळवण्यात येणार असून सुधारणा करण्याची विनंती केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.

40-60 हजारात बुलेटची विक्री
चोरलेल्या बुलेट या राज्यातील विविध जिल्ह्यातील असून ज्या ठिकाणी गाड्या चोरल्या तिथे त्या न विकता त्यांची इतरत्र विक्री केली जात होती. यासाठी संगणकावर प्रभुत्व असलेला सोहेल हा आरसी बुक व इतर कागदपत्रे हुबेहूब तयार करत होता. त्याच्याच आधारे तरुणांना बुलेट 40 ते 60 हजार रुपयात विकल्या जात होत्या. बुलेटची विक्री करताना पैशांची गरज आहे किंवा बँक रिकव्हरी असल्याचे कारण सांगून गाडी स्वस्तात विकत असल्याचे सांगत होते. ग्राहकाचा विश्वास संपादन झाल्यानंतर खोटी कागदपत्रे देऊन गाडीची विक्री करत होते.

या ठिकाणाहून चोरल्या बुलेट
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 1 कोटी 30 हजार रुपये किमतीच्या 44 बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींनी नवी मुंबईतील एक कार आणि 11 बुलेट चोरली आहे. याशिवाय ठाणे 11, पिंपरी-चिंचवड 12, मुंबई -3, पुणे शहर 1, पुणे ग्रामीण 1, अहमदनगर 1 तसेच अमोल याने केलेल्या इतर 18 गुन्ह्यांची उकल झाली आहे.