Pimpri : ‘बुलेट’ चोरी करणाऱ्या टोळीला अटक, 8 बुलेट जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – हिंजवडी पोलिसांनी बुलेट दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या टोळीकडून चोरीच्या आठ बुलेट दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

सुमित सुनील सावंत (19, रा. पारखेवस्ती, हिंजवडी), प्रशांत भीमराव गायकवाड (19, रा. डांगेचौक, थेरगाव), चेतन उर्फ श्रीपती शिवाजी कातपुरे (19, रा. लक्ष्मीनगर, थेरगाव), वैजनाथ नागनाथ चौधरी (22, रा. देवगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार मर्फी उर्फ आशिष भिसे आणि फान्सीस (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांचा पोलीस शोध घेत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यात बुलेट दुचाकी चोरीला गेल्याने तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, मारुंजी आणि हिंजवडी मधून बुलेट दुचाकी चोरून दोन चोरटे त्या बुलेट स्वतः वापरत आहेत. त्यातील एक चोरटा कोलते पाटील गेट जवळ थांबला आहे.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून सुमित सावंत याला हटकले. पोलिसांची चाहूल लागताच सुमित पळून जाऊ लागला. पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने एक बुलेट चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला अटक करून त्याच्याकडे आणखी कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांची नावे सांगितली. तसेच हिंजवडी, चिंचवड आणि वारजे माळवाडी परिसरातून बुलेट दुचाकी चोरी केल्याचे सांगितले.

पोलिसांनी सुमितच्या अन्य तीन साथीदारांना अटक केली. चोरटे पुणे जिल्ह्यातून बुलेट दुचाकी चोरी करून त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा येथे पाच ते दहा हजार रुपये किमतीला विकत होते. आरोपी फान्सीस याच्या मदतीने ही बुलेट विक्री केली जात होती. चोरट्यांनी परांडा येथील वैजनाथ चौधरी याला आणि अन्य लोकांना या बुलेट विकल्या होत्या. आरोपींकडून आठ लाख रुपये किमतीच्या आठ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक सागर काटे, पोलीस कर्मचारी मारणे, किरण पवार, शिंदे, आतिक शेख, कुंभार, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, राणे, पालवे, गडदे, चव्हाण, कोळी, गुमलाडू यांच्या पथकाने केली आहे.