बुलेट चोरट्यास अटक 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन बहिणीला भेटायला आलेल्या सराईत बुलेटचोराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून अटक करुन त्याच्याकडून चोरीची
दुचाकी जप्त केली.

तुषार भगवान अंबिलढगे (19, रा. चिंचपूर पांगुळ, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक वाकड परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांना एक बुलेटचोर काळेवाडी येथील धनगरबाबा मंदिराजवळ त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, सहाय्यक पोलीस फौजदार निकम, पोलीस कर्मचारी नदाफ, मुल्ला, लक्ष्मण आढारी, तांबोळी यांच्या पथकाने सापळा रचला.

संशयित तुषार तेथे आल्यानंतर पोलिसांनी धनगरबाबा मंदिर परिसरात सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या बुलेट (एमएच 11 / सीएन 5491) बाबत चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे समजले. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. या बुलेटबाबत वाकड पोलीस ठाण्यात वाहनचोरीचा गुन्हा दाखल आहे. तुषार याला यापूर्वी वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून 22 रॉयल इन्फिल्ड बुलेट मोटार सायकल जप्त करण्यात आल्या होत्या.