शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार कडून बंपर योजना…!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाच राज्यात झालेल्या निवडणुकांचा मोठा परिणाम भाजप सरकारवर झालेला दिसतो आहे.आता आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजप सरकार पुन्हा सत्तेत येण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच देशात मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी भाजपाने शेतकऱ्यांकरिता  नव्या योजना आणण्याचा विचार केला आहे. आता एका योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात २ हजार ५०० रूपये जमा होणार आहेत.
‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ योजनेची सुरूवात करणार
शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ योजनेची सुरूवात करणार असल्याची माहिती मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी दिली. यूबीआय योजने अंतर्गत प्रत्येकाच्या खात्यात २ हजार ५०० रूपये जमा होणार आहेत. या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असून येत्या २७ डिसेंबर रोजी ते या योजनेचा आढावा घेणार आहे. आगामी वर्षात १५ जानेवारीनंतर ही योजना देशभरात लागू होण्याची शक्यता आहे.
देशात प्रत्येक राज्यात यूबीआय योजनेची सुरुवात केली जाण्याची दाट शक्यता असल्याची माहिती सुब्रमण्यम यांनी दिली. सुब्रमण्यम यांनी २०१६-१७ च्या आर्थिक सर्वेक्षणात याबाबतची शिफारस केली. येत्या २०१९-२०२० वर्षात ही योजना लागू करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. या योजने अंतर्गत सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला विनाअट एक निश्चित रक्कम देणार आहे, असेही ते म्हणाले.
नोटबंदीचा पैसा योजनेसाठी 
गेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात प्रत्येक नागरिकाचे दर महिन्याला एक निश्चित उत्पन्न ठरवण्यासाठी यूबीआय योजना लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. या योजनेनुसार सरकार दरमाह प्रत्येक व्यक्तिला २ हजार ५०० रूपये देण्याच्या निर्णयावर विचार करत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह देशातील प्रत्येक गरीबाला २ हजार ५०० रूपये दरमाह मिळू शकतील.युनिव्हर्सल बेसिक इन्कम योजनेचा १० कोटी लोकांना लाभ होणार आहे. या योजनेने मोदी सरकार पहिल्या वर्षात १० हजार कोटी खर्च करणार आहे. युबीआय योजना लागू केल्यानंतर टप्प्याटप्प्याने सबसिडी बंद केली जाणार आहे. तर पैसे सरळ खात्यात जमा करण्याचे सुचित करण्यात येईल. नोटाबंदीचा पैसा या योजनेसाठी वापरण्यात येणार आहे.