ग्राहक मंचाचा फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरला दणका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुदत ठेवीच्या प्रकरणात धनादेश न वटल्याने दोषी ठरवत फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीला पुणे जिल्हा ग्राहक मंचाने दणका देत तक्रारदार वारजे येथील वैशाली व रत्नाकर माटे यांना ७,२६,१०० रुपये इतकी रक्कम मुदत पुर्तीनंतर आठ टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अनिल खडसे यांच्या अध्यक्षतेखालील क्षितिजा कुलकर्णी व संगीता देशमुख यांच्या मंचाने नुकताच हा निकाल दिला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वारजे येथील वैशाली व रत्नाकर माटे या दाम्पत्याने उदय पाटणकर या ब्रोकरच्या (एजंट) माध्यमातून २०१२ मध्ये फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत पाच लाखांची मुदत ठेव ठेवली होती. मुदतीनंतर २०१५ मध्ये फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरने माटे दाम्पत्याला ७,२६,१०० रुपये देणे होते. त्यासाठी माटे यांना सप्टेंबर २०१५ मध्ये दोन धनादेश देण्यात आले. मात्र, सदरचे दोन्ही धनादेश वटले नाहीत. माटे यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये पुन्हा नव्याने दोन धनादेश दिले. मात्र ते भरू नयेत, अशी सूचना कंपनीने केली. तिसऱ्यांदा मे २०१६ मध्ये दोन धनादेश दिले गेले. मात्र तेही वटले नाहीत. त्यामुळे माटे यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली.

ग्राहक मंचाकडे माटे यांचे वकील अॅड. डॉ. श्रीराम करंदीकर यांनी तक्रारींबाबतचा तपशील मांडला. या प्रकरणावर सुनावणी करीत ग्राहक मंचाने फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर व ब्रोकर पाटणकर यांना एक महिन्याच्या आत वरील रक्कम माटे यांना द्यावी, असे आदेश दिले आहेत.