काश्मीरमध्ये मेहबूबा आणि उमर अब्दुल्लांनंतर आता माजी IAS ‘टॉपर’ शाह फैसलवर PSA

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये माजी आयएएस टॉपर आणि राजकीय नेता शाह फैसलवर पब्लिक सेफ्टी अ‍ॅक्ट (PSA) लावण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीराचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर ताब्यात असलेल्या फैसल यांच्या विरोधात शुक्रवारी रात्री पीएसए अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले आहे.

पीएसए अंतर्गत दोन तरतूदी आहेत –
लोक व्यवस्था आणि राज्य सुरक्षेला धोका, पहिल्या तरतूदीनुसार कोणत्याही व्यक्तीला गुन्हा दाखल न करता सहा महिन्यांपर्यंत आणि दुसऱ्या तरतूदीनुसार कोणत्याही व्यक्तीवर गुन्हा दाखल न करता त्याला दोन वर्षांपर्यंत ताब्यात ठेवले जाऊ शकते.

फैसल यांना मागील वर्षी 13 आणि 14 ऑगस्टला रात्री दिल्ली विमानतळावर इस्तांबुलसाठी जाताना रोखण्यात आले होते आणि त्यांना श्रीनगरला आणण्यात आले होते. जेथे त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. माजी नोकरशाह आयएएस यांनी राजीनामा दिल्यानंतर जम्मू काश्मीर पीपल्स मूवमेंट पार्टीचे गठन केले होते.

यापूर्वी पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे वरिष्ठ नेता नईम अख्तर यांच्या विरोधात पीएसएअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नॅशनल कॉन्फ्रेंसचे महासचिव अली मोहम्मद सागर आणि महबूबा मुफ्तीचे मामा आणि वरिष्ठ पीडीपी नेते सरताज मदनी यांच्यावर पीएसएअंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले आहे.

तर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्या विरोधात पीएसए लावण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांची नजरकैदेतून मुक्ती होण्याच्या काही तासापूर्वी 6 फेब्रुवारीच्या रात्री दोघांच्या विरोधात पीएसए अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले होते.

राज्यातील कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर सर्वात आधी उमर यांचे वडील फारुक अब्दुल्ला यांच्या विरोधात पीएसए लावण्यात आला होता.