Pimpri News : हिंजवडी, भोसरीत घरफोडी, 9 लाखांचे दागिने लंपास

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भोसरी आणि हिंजवडी परिसरात दोन घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या असून या दोन्ही घटनेत नऊ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली घटना भोसरीतील दिघीरोड येथील अंजना अपार्टमेंट येथे घडली आहे. तर दुसरी घटना हिंजवडी येथील विनोदेनगर येथे घडली आहे.

भोसरी पोलीस ठाण्यात संजय गजानन कंडारकर (वय-56 रा. अंजना अपार्टमेंट, भोजराज कॉलनी, दिघी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. संजय यांनी त्यांच्या घराच्या कुलुपाची चावी घराबाहेर ठेवलेल्या बुटात ठेवली होती. अज्ञात चोरट्याने रविवारी सकाळी दहा ते दुपारी साडेचार दरम्यान बुटातून चावी घेऊन कुलुप उघडले. घरात प्रवेश करुन 29 हजार 700 रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली. पुढील तपास पोलीस हवालदार मुंडे करीत आहेत.

हिंजवडी येथे झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी 8 लाख 41 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी राजेंद्र रामभाऊ विनोदे (वय-49 रा. रामदादा निवास शेजारी, विनोदेनगर, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला.

राजेंद्र विनोदे यांच्या भावाचे घर कुलूप लावून बंद होते. शनिवारी सकाळी आठ ते रविवारी सकाळी सात या दरम्यान चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरुमध्ये असलेल्या कपाटातून 4 लाख 55 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण, 2 लाख 80 हजाराचा सोन्याचा गोफ, 35 हजारांची सोन्याची पिळ्याची अंगठी, 40 हजारांची चांदीची भांडी आणि 12 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 8 लाख 41 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.