एका रात्रीत तब्बल १० ठिकाणी चोरट्यांनी केली हात की सफाई

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आजरा शहरासह पेरणोलीत एकूण १० ठिकाणी डल्ला मारत चोरट्यांनी सुमारे पावणेतीन लाखांची रक्कम लंपास केली. चोरट्यांनी तीन संस्थांसह बंद घरामध्ये ही हात की सफाई केली आहे. आजरा शहरात ६ ठिकाणी, तर पेरणोली गावात ४ ठिकाणी चोऱ्या झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. बंद असलेल्या संस्था व घरांच्या दरवाजाचे कडी-कोयंडे उचकटून सर्व चोऱ्या केल्या आहेत.

आजरा येथील चाफे गल्लीत असलेल्या करपादेवी दूध संस्थेतील १ लाख २० हजार रुपयांची रक्कम लंपास केली आहे. सुरेश देसाई, अर्जुन पडते, सुबराव वसंत पाटील, विनोरीगो डिक्रुझ व रिचर्ड मार्शल मिनेसीस यांच्या घरातही चोरट्यांनी चोरी केली. ही सर्व घरे बंद होती. पेरणोलीत गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी धाडसी चोरी झाली. येथील बळीराजा कुरकुंदेश्वर पतसंस्थेतील १ लाख २७ हजार ९१९ रुपये, संत तुकाराम दूध संस्था, केदारलिंग सेवा संस्था व सीताबाई केशव मोहिते यांच्यातील १४०० रुपयांची चोरी केली. येथेही बंद असणाऱ्या संस्था व घरांमध्ये चोऱ्या झाल्या आहेत. रात्री अडीचच्या सुमारास पेरणोली येथे चोरटे आल्याचा सुगावा लागताच सर्जेराव देसाई यांनी आरडाओरड केल्यामुळे ते पळून गेले. ३० ते ४० वयोगटातील अंदाजे ९ जण होते. त्यातील एकाच्या अंगावर काळ्या रंगाचा शर्ट तर २-३ जणांनी करड्या रंगाचे जॅकेट घातले होते. स्टँडपर्यंत ते पळत गेले. नंतर वाहनाने ते पसार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बळीराजा पतसंस्था, दूध संस्था व सेवा संस्थेत शनिवार असल्यामुळे रक्कम शिल्लक राहिली. हीच परिस्थिती आजऱ्यातील करपादेवी दूध संस्थेची होती. याचा फायदा घेत चोरांनी रक्कम लंपास केली. पेरणोली पतसंस्थेचे रोखपाल नेताजी पाटील, तर करपादेवी संस्थेचे सचिव रमेश नाईक यांनी आजरा पोलिसांत तक्रार दिली आहे. पेरणोलीतील केदारलिंग सेवा संस्था व गणेश हाळवणकर येथेही चोरीचा प्रयत्न झाला.

यवतमाळ | चाकूने भोसकून युवकाचा खून

या चोरीचा तपास करण्यासाठी कोल्हापूर येथील श्वानपथक मागविण्यात आले होते. आजरा येथे रवळनाथ कॉलनीच्या रस्त्यापर्यंत श्वान येऊन घुटमळले, तर पेरणोलीत बसस्थानकापर्यंत आले व तेथेच घुटमळले. चोरांनी वाहनांतून पलायन केल्याचा तर्क यावरून व्यक्त होत आहे. आजरा शहरासह पेरणोलीत झालेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जाहिरात