सोलापूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार केंद्रीय महासचिव कॉ सीताराम येचुरी व अन्य पुरोगामी, लोकशाहीवादी विचारवांतावर खोटे आरोप केले. शिवाय दिल्ली दंगल प्रकरणात नाव गोवले आणि आरोपपत्र दाखल केले याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करीत त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन करण्यात आले.आज सकाळी अकराच्या सुमारास जिल्हादिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

ज्येष्ठ मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलं. आडम यांनी सांगितले की, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी, योगेंद्र यादव, अपूर्वानंद, जयंती घोष यांच्यावर केंद्र सरकारने कूटनीतीनं दिल्ली दंगलीत गोवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी पक्षाकडून देण्यात आला. यावेळी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलीस मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान, दिल्लीत 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान ही दंगल उसळली होती. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे भारत दौऱ्यावर होते. पूर्व दिल्लीत नागरिकत्व कायद्यावरुन सुरु झालेल्या आंदोलनाने अचानक हिंसक वळण घेतलं होतं. या दंगलीमध्ये जवळपास 53 जणांचा बळी गेला होता. यानंतरया दंगलीच्या चौकशीसाठी एक समिती बसवण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतर सीताराम येचुरी यांनी ही केंद्र सरकारची सूडबुद्धी असल्याचा आरोप केला आहे.

दंगली प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आपल्या पुरवणी आरोपपत्रात अनेक नेत्यांच्या नावांचा समावेश केला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, स्वराज्य अभियानचे योगेंद्र यादव, प्राध्यापक अपूर्वानंद,डॉक्युमेंटरी फिल्म मेकर राहुल रॉय यांचा आरोपपत्रात समावेश आहे. कटात सहभागी झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.