Kolhapur News : …म्हणून मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्या पुतळ्याचे दहन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान केल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांच्या पुतळ्याचे मंगळवारी कोल्हापुर येथे दहन करण्यात आले. त्यावरून कोल्हापुरातील शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची बदनामी, अवमान करणे थांबवा, नाहीतर कर्नाटकच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला.

कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी परिसरात मंगळवारी दुपारी शिवसैनिकांच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. ‘मुर्दाबाद, मुर्दाबाद येदियुरप्पा मुर्दाबाद’, ‘कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत त्यावेळी निदर्शने करण्यात आली. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी महाराष्ट्राबाबत वादग्रस्त विधान केले होते.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले कि, कन्नड रक्ष‌ण वेदिका संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान केला होता. त्याचा आम्ही आज निषेध केला. यापुढे महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी अथवा अवमान केल्यास शिवसैनिक हे खपवून घेणार नाही. त्यासह कर्नाटकमधील एकाही मंत्र्याला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, तसेच बेळगाव महापालिकेच्या इमारतीवर लावण्यात आलेला लाल-पिवळा रंगाचा ध्वज लवकर उतरविण्यात यावा, अन्यथा गुरुवारी (दि. २१) बेळगाव येथील मोर्चामध्ये कोल्हापुरातील शिवसैनिक सहभागी होऊन हा ध्वज उतरवतील, असा इशारा विजय देवणे यांनी दिला. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, अवधूत साळोखे, दत्ताजी टिपुगडे, चंद्रकांत भोसले, संभाजी भोसले, राजू जाधव, प्रवीण पालव, शशी बीडकर, मंजित माने आदींची उपस्थिती होती.