Beed News : दुर्देवी ! ऊसाच्या फडात झोपलेल्या शेतकऱ्याचा जळून मृत्यू, घातपाताचा संशय

बीडः पोलीसनामा ऑनलाईन – पेटवून दिलेल्या ऊसाच्या फडात झोपलेल्या एका शेतक-यांचा जळून मृत्यू झाला. श्रीराम वस्ती (ता. गेवराई) येथे शुक्रवारी (दि. 19) रात्री दहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान सदर प्रकार घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

दिगांबर विक्रम पांढरे (वय 27) असे मृत शेतक-याचे नाव आहे. दरम्यान मयत दिगांबर पांढरे यांच्या वडीलाचे निधन झाल्याने सर्व जबाबदारी त्यांच्यावरच असल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत दिगांबर पांढरे हे शुक्रवारी गेवराई येथील रोजंदारीचे काम करुन रात्री घरी आले होते. मात्र, त्यांना कोणाचा तरी फोन आल्याने ते रात्री घराबाहेर पडले, ते परत घरी आलेच नाहीत, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. त्यानंतर दुस-या दिवशी शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह जाधव यांच्या ऊसाच्या फडात जळालेल्या अवस्थेत आढळला. जाधव यांचा ऊस गाळपास गेल्यामुळे त्यांनी ऊसाचे पाचरट पेटवून दिले होते. याच फडात दिगांबर यांचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यास मृतदेह आणला असताना सदर प्रकार घातपाताचा असून, खुनाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाहीत असा पवित्रा नातेवाईकानी घेतला होता. तालवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दिगांबर यांच्या पाश्चात्य आई, पत्नी, तीन महिन्याचा मुलगा आहे.