पुणे : धायरीत प्लायवूडच्या कारखान्याला भीषण आग ; कारखाना जळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – धायरी स्मशानभूमीजवळ असणाऱ्या प्लायवूडचे दरवाजे बनविणाऱ्या कारखान्याला पहाटे भीषण आग लागली. पहाटे सव्वा तीन वाजता या आगीची माहिती अग्निशामक दलाला मिळाली होती. या आगीत कारखान्यातील सर्व लाकडी साहित्य, ३ मशीन्स जळून खाक झाले.

धायरी येथील मनोहर मंगल गार्डन शेजारी व्हिजन डोअर हा प्लायवूडचे दरवाजे बनविणारा कारखाना आहे. कारखान्याच्या सुरुवातीला त्यांचे गोदाम आहे. त्यात लाकडी पट्ट्या ठेवलेल्या होत्या. त्यानंतर कारखान्याची मशीन्स होती. त्याच्य मागे कामगार राहत होते. पहाटे सव्वा तीनच्या सुमारास एक कामगार उठला. तेव्हा कारखान्यात आग लागल्याचे त्याच्या लक्षात आले. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या व एका टॅकरने ही आग अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. या आगीत कारखान्यातील सर्व मशीनरी, लाकडी पट्ट्या जळून कोळसा झाला आहे.

ही आग कारखान्यात कशी लागली, हे समजू शकले नाही. कारखान्याच्या बाहेरील बाजूला लाकडे कापल्यानंतर शिल्लक राहिलेला भुसा टाकलेला होता. तोही जळून खाक झाला. अगोदर या भुश्याचा आग लागली व ती कारखान्यात पसरली असल्याचा संशय आहे.