सप्तश्रृंगी गडावरून येणाऱ्या बसचा अपघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सप्तश्रृंगी गडावरून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला देवाळ्याजवळ अपघात झाला आहे. या अपघातात २ लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत. तर १७ ते १८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर देवाळा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नाशिक जिल्ह्यातील वणी येथील आदिशक्ती श्री सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी श्रीराम नवमी पासून भाविक येत असतात. दरम्यान मंगळवारी सकाळी देवीचे दर्शन घेऊन भाविकांची बस परतत होती. त्यावेळी देवाळाजवळ आल्यावर दगडी पुलावर समोरून एक ट्रक आल्याने ट्रकला वाचविण्यासाठी बसने हुलकावणी दिली.

त्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती दगडी पुलावरून खाली कोसळली. बसला अपघात झाल्याचे पाहताच स्थानिकांनी जखमींना बाहेर काढले. बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. त्यातील १७ ते १८ जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर लहान मुलांना गंभीर मार लागला आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.