Madhya Pradesh Accident : 54 प्रवाशांनी खचाखच भरलेली बस कालव्यात कोसळली, 7 जणांना वाचवलं तर 47 बेपत्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशात भीषण अपघात झाला असून 54 प्रवाशांनी भरलेली बस खोल कालव्यात कोसळली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. सात प्रवाशांना वाचवण्यात आलं असून इतरांचा शोध घेतला जात आहे. बस सतनाच्या दिशेने जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.16) सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 54 प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर सात प्रवासी पोहत बाहेर आले तर चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कालवा 30 फूट खोल असल्याने पूर्ण बसच त्यात बुडाली आहे. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात येत आहे.

बसचा शोध घेताना अडथळे येत असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी घटनेची माहिती घेतली असून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत आहेत. दरम्यान, अपघातानंतर SDRF चे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.