गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या बसला ‘आग’

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सवाला कोकणात जात असलेल्या एसटी बसला भीषण आग लागून त्यात संपूर्ण बस जळून खाक झाली. प्रवाशांनी खच्चून भरलेल्या या बसमधील सर्वच्या सर्व ६० प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून काही किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.

मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरेपासून जवळच असलेल्या वडपाले येथे पहाटे ही दुर्घटना घडली. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून मुंबईतील परेल येथून ही बस चिपळूणला निघाली होती. बस खच्चुन भरली होती. चिपळूणच्या सावर्डेजवळील दहीवली खुर्दच्या दिशेने ही बस निघाली असताना वडपाले गावाजवळ ही बस आली असताना बोनेटमधून धूर येऊ लागल्याचे बसचालकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. बसला आग लागल्याचे पहाताच प्रवासी बसमधून खाली उतरले. त्यानंतर आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण बसने पेट घेतला. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली.

या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आधीच कोकणात जाणाऱ्या वाहनांनी हा महामार्गावर प्रचंड वाहतूक असताना हा अपघात झाल्याने ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आता ही बस बाजूला केल्याने वाहतूक सुरु झाली असून वाहने पुढे मार्गस्थ होत आहे.

गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे रस्त्यावर हाल होत असतानाच रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसला आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्या सध्या तीन तास उशीराने धावत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like