बंद झाले ‘अ‍ॅटलस’ सायकलचे उत्पादन, साहिबाबाद येथील शेवटच्या युनिटमधील सुद्धा काम ‘स्टॉप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जागतिक सायकल दिवस पार पडल्यानंतर भारतातील सायकलचे एक युग देखील संपले आहे. 71 वर्ष देशात सायकलसाठी पर्याय बनलेल्या अ‍ॅटलस सायकलचे शेवटचे मॅन्युफॅक्चरिंग युनिटसुद्धा बंद झाले आहे. मॅनेजमेंटने फंड कमी असल्याने साहिबाबाद येथील युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला. हे कंपनीचे शेवटचे युनिट होते ज्यामध्ये काम सुरू होते. 2014 नंतर कंपनीला घरघर लागली होती.

मॅनेजमेंटने मीडियाशी बोलताना सांगितले की, कंपनी फंड जमवण्याचा प्रयत्न करत आहे, फंड मिळताच युनिट पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. कंपनीने स्पष्ट केले की, उत्पादन बंद झाल्याने प्रभावित झालेल्या कर्मचार्‍यांना नियमानुसार पैसे दिले जातील. कंपनीने म्हटले कामगारांना काढले जात नाही, त्यांना प्लांटमध्ये यावे लागेल. कंपनीने म्हटले की, फंड मिळाल्यानंतर त्यांचे वेतनाचे पैसे दिले जातील. साहिबाबाद प्लांट देशातील सर्वात मोठा सायकल प्लाट आहे. येथे वर्षाला 40 लाख सायकल तयार होतात, प्लांटमध्ये सुमारे 1000 कर्मचारी काम करतात.

कंपनी 2014 पासून सतत तोट्यात सुरू होती. या कारणामुळे 2014 मध्ये मालनपुर प्लांट आणि 2018 मध्ये सोनीपत प्लांट बंद करण्यात आला. सध्या साहिबाबाद एकमेव प्लांट होता, ज्यामध्ये काम सरू होते. आता तोही बंद करण्यात आला आहे. अ‍ॅटलसची सुरूवात 1951 मध्ये जानकी दास कपूर यांनी सोनीपतमध्ये केली होती. पहिल्याच वर्षी कंपनीने 12 हजार सायकलचे उत्पादन केले होते. तर कंपनीने 1958 पासून अ‍ॅटलस सायकलची निर्यात सुद्धा सुरू केली होती.