सावधान ! FASTag च्या संबंधीत करू नका ‘ही’ चूक, अन्यथा टोल पार न करता कापले जातील पैसे

नवी दिल्ली : देशभरात फास्टॅगचे नियम अनिवार्य करण्यात आले आहेत. या अंतर्गत विना फास्टॅगच्या गाडीकडून टोल प्लाझावर दुप्पट टोल वसूल केला जात आहे. प्रत्यक्षात फास्टॅगची व्यवस्था मागील अनेक दिवसांपासून लागू आहे. मोठ्या संख्येने लोक याचा वापर करत आहेत. सध्या अनेक फास्टॅग वॉलेटशी लिंक आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पैसे टाकावे लागतात. तर अनेक बँकांचे फास्टॅग थेट खात्याशी लिंक आहेत. टोल प्लाझावर पोहचताच पैसे तुमच्या खात्यातून कापले जातात.

परंतु, फास्टॅगबाबत सावध राहण्याची सुद्धा आवश्यकता आहे. जर तुम्ही वेळीच लक्ष दिले नाही तर मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते. नेहमी लोक आपली जुनी कार विकतात पण आपला फास्टॅग काढून टाकण्यास विसरतात. किंवा त्यास डिअ‍ॅक्टिव्हेट करत नाहीत. जर तो फास्टॅग तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर कार विकल्यानंतर फास्टॅगचा वापर झाल्यास पैसे तुमच्या बँक खात्यातून कापले जातील.

कार विकताना लक्ष ठेवा
फास्टॅगचा वापर सरकार हळुहळु वाढवण्यावर जोर देत आहे, येत्या काळात शक्य आहे की, पार्किंग आणि अन्य ठिकाणांवर तुमच्या कारची ओळख फास्टॅगनेच होईल. अशावेळी याबाबत सावध राहावे लागेल. कार विकताना किंवा एक्सचेंज करताना जुना फास्टॅग काढून टाकला पाहिजे. किंवा तो डिअ‍ॅक्टिव्हेट केला पाहिजे. कारण या कारने प्रवास नवीन ग्राहक करेल पण पैसे तुमच्या खात्यातून कापले जातील.

डिअ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी सीरियल नंबर आवश्यक
जुना फास्टॅग डिअ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी तुमच्याकडे फास्टॅगमध्ये नोंदलेला सीरियल नंबर असणे आवश्यक आहे अन्यथा तो डिअ‍ॅक्टिव्हेट सुद्धा होऊ शकणार नाही. यासाठी तुमच्याकडे जेवढ्या कारमध्ये फास्टॅग असेल त्यांच्या सीरियल नंबरचा रेकॉर्ड ठेवणे खुप आवश्यक आहे.

अशाप्रकारे करा डिअ‍ॅक्टिव्हेट
कार एक्सचेंज करत असाल विकत असाल तर गाडीवरून फास्टॅग हटवा. किंवा आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून फास्टॅगचा टोल फ्री नंबर 1800-120-4210 वर कॉल करा. येथून तुमच्या मोबाइलवर लिंक येईल जेथे तुम्ही गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, फास्टॅगचा सीरियल नंबर टाकून फास्टॅग डिअ‍ॅक्टिव्हेट करू शकता.