भारतात सरासरी मासिक वेतन 32800 रूपये, जागतिक यादीमध्ये 72 व्या स्थानी : रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरासरी मासिक वेतनामध्ये भारत संपूर्ण जगात 72व्या स्थानी आहे. एका रिपोर्टनुसार भारताचे सरासरी मासिक वेतन 32,800 रुपये म्हणजे 437 डॉलर इतके आहे. या यादीत जगातील 106 देशांचा समावेश असून स्वित्झर्लंड पहिल्या स्थानावर आहे. पिकोडी डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली आहे. डिस्काउंट कूपन देणारी आंतरराष्ट्रीय कंपनी पिकोडी डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, स्वित्झर्लंड 5,989 डॉलर म्हणजे 4,49,000 रुपये सरासरी मासिक वेतनासोबत या यादीत पहिल्या स्थानी आहे. तर, 2,700 रुपये म्हणजे 36 डॉलर सरासरी मासिक वेतनासोबत क्युबा हा देश यादीत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. यादीमध्ये स्वित्झर्लंड नंतर तिसऱ्या स्थानी लगझेम्बर्गचे 3,00,000 रुपये आणि चौथ्या स्थानी अमेरिकेचे 2,64,900 रुपये म्हणजे 3,534 डॉलर सरासरी मासिक वेतन आहे. यादीतील 10 देशांमध्ये डेन्मार्क (3,515 डॉलर), सिंगापूर (3,414 डॉलर), ऑस्ट्रेलिया (3,333 डॉलर), कतार (3,232 डॉलर), नॉर्वे (3,174 डॉलर), हाँगकाँग (3,024 डॉलर), आणि आईसलँड (2,844 डॉलर) सहभागी आहेत.

भारताच्या 32,800 रुपये सरासरी मासिक वेतनाने कझाकस्तान (32,700 रुपये), ब्राझील (26,000 रुपये) आणि मिस्त्र (16,400 रुपये) यांना मागे टाकले आहे. यादीत क्युबा, युगांडा आणि नायझेरिया सारखे देश यादीत सर्वात खालच्या स्थानी आहेत. या यादीत असणाऱ्या 16 आशियाई देशांमध्ये भारत 10 व्या स्थानी आहे. दक्षिण कोरिया (1,72,900 रुपये), चीन (72,100 रुपये), मलेशिया (62,700 रुपये) आणि थायलंड (46,400 रुपये) यांसारखे देश भारताच्या पुढे आहेत. भारतानंतर व्हिएतनाम (30,200 रुपये), फिलिपिन्स (23,100 रुपये), इंडोनेशिया (22,900 रुपये) आणि पाकिस्तान (15,700 रुपये) हे देश आहेत.