अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकरीता व्यवसायासाठी कर्ज योजना

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय अनुसूचित जमाती पुरस्कृत योजनांचा (नॅशनल शेड्यूल ट्राइब्स फाइनेंस एंड डेवलपमेंट कॉरपोरेशन) लक्षांक सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त झालेला असून सदर आदिवासी लाभार्थ्यांकरिता व्यवसाय करण्यासाठी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. तरी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी कर्ज प्रकरणे सादर करावी व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाचे शाखा व्यवस्थापक एच.एन. पाटील यांनी केले आहे.

या योजने अंतर्गत महिला सशक्तिकरण योजनेच्या माध्यमातून लहान उद्योगधंद्यांना 1 लक्ष रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य अल्प व्याजदराने देण्यात येते. मुदत कर्ज योजनेच्या माध्यमातून लहान उद्योगांना चालना देण्यासाठी 2 लक्ष रुपये, हॉटेल ढाबा व तत्सम व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लक्ष रुपये, प्रशिक्षित बेरोजगार युवकांना स्पेअर पार्ट, गॅरेज, ऑटो वर्कशॉप व तत्सम व्यवसाय उभारणीसाठी 5 लक्ष रुपये तर प्रवासी वाहन व्यवसायासाठी 9 लक्ष 10 हजार रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य अल्प व्याजदराने देण्यात येते.

यामध्ये एनएसटीएफडीसी तर्फे कर्ज हिस्सा 80 किंवा 90 टक्के, शबरी महामंडळा तर्फे मार्जिन कर्ज हिस्सा 10 किंवा 5 टक्के, तर लाभार्थी वैयक्तिक सहभाग हिस्सा 10 किंवा 5 टक्के असा आहे. स्वयंसहायता बचत गट योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 5लक्ष रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य अल्प व्याजदराने देण्यात येते.

वैयक्तिक कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रे :
तहसील किंवा उपविभागीय कार्यालय यांचा जातीचा दाखला, शाळेचा दाखला (वय वर्षे 18 ते 45), तहसील कार्यालयाकडील उत्पन्नाचा दाखला (ग्रामीण व शहरी भागासाठी 3 लक्ष रुपयाच्या आत असावे), प्रकल्प कार्यालयाकडून सुशिक्षित बेरोजगार दाखला, इतर बॅंकांकडून तथा संस्थांकडून कर्ज घेतले नसल्यास नाहरकत प्रमाणपत्र दोन सक्षम जामीनदार, लाभार्थी नोकरी करीत असल्यास कार्यालय प्रमुखाच्या सहीने कर्ज वसुली हमीपत्र व अद्ययावत पगार दाखला, सातबारा उतारा, व्यवसायासाठी जागा, जागा स्वत:ची असल्यास घरपट्टी आवश्यक, जागा भाड्याची असल्यास करारनामा, व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच दुकाने अधिनियमाखालील परवाना आवश्यक, खर्च व उत्पन्न व्यवसाय प्रकल्प अहवाल, व्यवसायासाठी लागणारे सर्व साहित्याचे कोटेशन, व्यवसाय अनुभव व प्रशिक्षण प्रमाणपत्र, राशन कार्ड छायाप्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, तीन पासपोर्ट साईज फोटो, वाहन व्यवसायासाठी वाहन परवाना, बॅच परमिट व अनुभव आवश्यक आहे.

स्वयंसहायता बचत गट योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
बचत गट व सहकारी संस्थांची नोंदणी प्रमाणपत्र, बचत गट व सहकारी संस्थांच्या सर्व सभासदांची यादी तसेच राशन कार्ड,आधार कार्ड व जातीचे दाखले आवश्यक. बचत गट व सहकारी संस्थांचे कमीत कमी सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट, ग्रामपंचायत व नगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र, जामीन राहण्यासाठी अध्यक्ष व सचिव यांचे सातबारा उतारा, व्यवसाय संबंधी लागणाऱ्या सर्व साहित्याचे कोटेशन, तसेच सहकारी संस्थांचे तीन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल आवश्यक आहे.

सदर योजनेची कर्ज परतफेड पाच वर्षात करणे आवश्यक असल्याने कर्जाची परतफेड वर्षातून चार वेळा 20 समान हप्त्यात करणे आवश्यक राहील.

या योजनांचे शाखा कार्यालयात अर्ज विक्री सुरू असून इच्छुक अर्जदाराने शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. शाखा कार्यालय, मधुबन प्लाझा दुसरा माळा, माउंट कार्मेल स्कूल जवळ , गोपाळ नगर चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधून सदर कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.