मधमाशी पालन आणि मातीची भांडी बनवण्याचे काम सुरू करण्यासाठी मिळेल मदत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तरूणांना आपला स्वताचा व्यवसाय सुरू करून चांगले उत्पन्न कमावण्यासाठी सरकारने आज दोन योजनांसाठी दिशा निर्देश सादर केले आहेत. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाने गुरुवारी मातीची भांडी आणि मधमाशी पालनाशी संबंधित कामे सुरू करण्यासाठी इच्छुक लोकांना मदत करण्यासाठी दिशानिर्देश दिले आहेत.

नव्या दिशा निर्देशांनुसार, मातीची भांडी बनवण्यासाठी सरकार कुंभाराचे चाक आणि माती तयार करण्याच्या उपकरणासाठी मदत देईल. यासोबतच सरकार कारागिरांना मातीची भांडी किंवा मातीचे अन्य सामान बनवण्यासाठी ट्रेनिंगसुद्धा देईल. मंत्रालयानुसार हा उपक्रम मातीच्या भांड्यांचे उत्पादन, तांत्रिक माहिती वाढवणे आणि कमी खर्चात नवी उत्पादने विकसित करण्यासाठी आहे.

प्रशिक्षण आणि आधुनिक स्वयंचलित उपकरणांच्या माध्यमातून मातीची भांड्यांच्या कारागिरांना आपले उत्पन्न वाढवण्यात मदत होईल. मंत्रालयानुसार मातीची भांडी निर्मिती योजनेतून एकुण 6,075 पारंपरिक आणि विना-पारंपरिक कारागिर, ग्रामस्थ आणि प्रवासी मजूरांना लाभ मिळेल.

तर वर्ष 2020-21 साठी आर्थिक सहाय्य म्हणून 19.5 कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात येईल. तर मंत्रालयाच्या स्फुर्ती योजनेंतर्गत मातीची भांडी किंवा टाइल्स बनवण्याची क्षमता वाढवणे आणि क्लस्टर स्थापन करण्यासाठी 50 कोटी रूपयांच्या अतिरिक्त निधीची तरतुद करण्यात आली आहे.

या सोबतच मधमाशी पालनासाठी, सरकार मधमाशांसाठी बॉक्स आणि उपकरणाच्या किटसाठी मदत देईल. या योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी जरूरी सर्व वस्तू प्रवाशी मजूरांना सुद्धा वितरित करण्यात येतील. या योजनेची सुरूवात 2020-21 च्या दरम्यान एकुण 2050 मधमाशा पालक, व्यवसायिक, शेतकरी, बेरोजगार तरूण, आदिवासींच्या मदतीसाठी दिली जाईल. यासाठी 13 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.