चक्क विमानातही पॉर्नचं वेड ; उद्योगपतीला पडलं महागात

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाईन – विमानातही पॉर्न क्लीप पाहणं एका उद्योगपतीला महागात पडलं आहे. महिलेच्या पाठीमागे बसून अश्लील क्लीप पाहात असल्याची तक्रार महिलेने केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु, महिलेने पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिल्याने त्याला समज देऊन सोडून देण्यात आले. शनिवारी रात्री हा प्रकार मुंबई-चेन्नई प्रवासादरम्यान घडला आहे.

मुंबई विमानतळावरून शनिवारी रात्री १०. ५५ ला विमानाने चेन्नईला उड्डाण केले. त्यावेळी विमानात संबंधित महिला आपल्या मुलासोबत प्रवास करत होती. त्यावेळी संबंधित उद्योगपती मागील सीटवर बसलेले असताना ते पॉर्न क्लीप पाहात होते. मात्र, ते मला दिसेल अशा पद्धतीने हातात मोबाईल धरून क्लीप पाहात असल्याचा आरोप महिलेने केला आहे.

महिलेने यासंदर्भात क्रू मेंबर्सकडे तक्रार केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी उद्योगपतीला जागा बदलण्याची विनंती केल्यावर त्याने नकार दिला. त्यानंतर कॅप्टनने यासंदर्भात उद्योगपतीशी बोलणी करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे संबंधित महिला व तिच्या मुलाला दुसऱ्या सीटवर बसविण्यात आले. कॅप्टनने याची माहिती ट्रॅफिक कंट्रोलला दिली होती. चेन्नई विमानतळावर उतरल्यानंतर सीआयएसफच्या जवनांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने महिलेची माफी मागितली. त्यामुळे तिने त्याच्याविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याने त्याला समज देऊन सोडण्यात आले.