बिटकॉईनच्या नावाखाली व्यापाऱ्याला ८ कोटीचा गंडा

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन – गुंतवणूकीतून जास्त फायदा मिळवून देण्याच्या आमिषाने मुंबतील मीरारोड येथील एका व्यापाऱ्याला आणि त्याच्या मित्राला सुरत येथील एकाने ८ कोटी ४६ लाख १५ हजार ६६४ रुपयांचा गंडा घातला आहे . राकेश विरजीया असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरारोड परीसरात राहणारे परेशभाई कारिया हे आपल्‍या मित्रासह ऑगस्‍ट २०१७ मध्‍ये अलिबाग येथे फिरायला आले होते . मित्राने त्‍यांची ओळख सुरत येथील राकेश विरजीया यांच्‍याशी करून दिली. त्‍यावेळी राकेश याने या दोघांना बिटकॉईनमध्ये असलेली क्रिप्टोकरन्सी ही हेक्टाईन आणि झेक्सोको कॉईनमध्ये परावर्तित केल्‍यास तुम्‍हाला मोठा फायदा होईल, असे आमिष दाखवले.

राकेश याने दाखवलेल्या झेक्सोको कॉईन वेबसाईट बंद पडलेली असताना वेबसाईटवरील बनावट स्क्रिनशॉटची कॉप तसेत बिटकॉईनची विक्री करुन ही रक्कम झेक्सोको कॉईनमध्ये गुंतवणूक प्रक्रिया सुरु असल्याची कागदपत्रे त्यांना दाखवली . मात्र , याचा कोणताही लाभ परेशभाई आणि त्यांच्या मित्राला मिळाला नाही. याची माहिती घेतली असता प्रत्यक्ष गुंतवणूक न करता ही रक्कम राकेशने परस्पर काढून घेतल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी परेशभाई कारिया यांनी अलिबाग पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली असून राकेश विरजीया याच्‍याविरुद्ध फसवणुकीचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे . स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक ए. जे. शेख या गुन्‍ह्याचा तपास करीत आहेत .