देहूरोड येथील प्रसिद्ध व्यापाऱ्याचे अज्ञातांकडून अपहरण

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाइन – देहूरोड बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापाऱ्याचे सकाळी सातच्या सुमारास मोटारीतून आलेल्या चौघांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात आणि व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. घटेनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपींना पकडण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.

ईश्वर आगरवाल ( वय ५२ , रा मेन बाजार, देहूरोड, पुणे ) असे अपहरण करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते सामाजिक कार्यकर्ते असून देहूरोड येथील श्री नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगरवाल हे त्यांच्या घराजवळ असलेल्या मंदिरात देवपूजेसाठी जात असताना सकाळी सातच्या सुमारास एका मोटारीतून आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले आहे.उधारीच्या व्यवहारातून अपहरण करण्यात आल्याची शक्यता आहे. अपहरण करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असून त्यांच्या तपासासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांकडून दुकानांतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त जी. एस माडगूळकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहे.