OTP किंवा इतर कोणतीही माहिती न देता व्यापाऱ्याला बसला 1.86 कोटींचा फटका, ‘सिमकार्ड घोटाळा’ म्हणजे काय ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओटीपी किंवा इतर कोणतीही माहिती न देता एका झटक्यात व्यापाऱ्याला 1.86 कोटींचा तोटा झाला. त्याच्या खात्यातून संपूर्ण पैसा साफ झाला. काय आहे संपूर्ण प्रकरण, आपल्याला कसे फसवतात आणि अशा घटनांचे संपूर्ण गणित कसे असते याबाबत समजून घेऊया. सामान्यत: ओटीपीशिवाय कोणताही व्यवहार होऊ शकत नाही. फक्त आंतरराष्ट्रीय डेबिट / क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या व्यवहार वगळता. परंतु मुख्य गोष्ट अशी आहे की या घटनेत कोणत्याही कार्डावरून कोणताही व्यवहार झालेला नाही. त्या व्यापार्‍याच्या खात्यातून भिन्न भिन्न खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत. पैसे ट्रान्सफरसाठी ओटीपी आवश्यक असतो. याशिवाय ट्रान्सफर करणे शक्य नाही. तर सर्वप्रथम, प्रश्न उद्भवतो की या ठगांना ओटीपी कोठून मिळाला?

पण मुख्य म्हणजे सिमकार्ड व्यापाऱ्याकडे होते, त्या व्यापाऱ्याने ओटीपी कोणालाही सांगितला नाही. सांगणार तरी कसे? त्याच्या मोबाईलमध्ये ओटीपी आलेलाच नव्हता. उत्तर असे आहे की या ठगांनी सिम स्वॅप (SIM Swap) केले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सिम स्वॅप काय आहे. त्याबाबत जाणून घेऊया.

सिम स्वॅप म्हणजे काय?
सिम स्वॅपचा अर्थ असा आहे की जर आपल्याला जुने सिम कार्ड बदलून त्याच नंबरचे नवीन कार्ड मिळवायचे असेल तर या प्रक्रियेस सिम स्वॅप असे म्हणतात. कधीकधी मोबाइल धारकांना याची आवश्यकता भासते. जसे की तुमचा मोबाइल हरवल्यास तुम्हाला त्याच नंबरचे दुसरे सिम कार्ड घ्यावे लागते. तसेच सिम पोर्ट करणे, सिम तुटणे अशा वेळी सिम स्वॅपची गरज भासते. पण ठग त्याचा गैरवापर करतात. ते कोणालाही लक्ष्य करू शकतात. त्याची सर्व खाजगी माहिती गोळा करून योग्य व्यक्तीच्या सिमकार्डला बंद करून आपल्या जवळच्या रिकाम्या सिममध्ये नंबर कार्यान्वित केला जातो.

सिम स्वॅपसाठी ठगांनी त्या व्यापार्‍याचा मोबाइल हॅक करून त्याची सर्व वैयक्तित माहिती जसे की नाव पत्ता, आधार कार्ड, आयडी क्रमांक, बँकिंग माहिती इत्यादी घेतली. त्या व्यापाऱ्यांनी एखाद्या इनसिक्योर वेबसाइट, संक्रमित अ‍ॅप, एसएमएस किंवा ईमेलच्या संक्रमित लिंक किंवा फिसिंग वेबसाइटला भेट दिली असेल आणि त्यांचे बँकिंग आणि इतर तपशील प्रविष्ट केले असतील. ज्यामुळे सर्व वैयक्तिक आणि गुप्त माहिती ठगांपर्यंत पोहोचली असावी. सर्व माहितीनंतर ठगांना फक्त ओटीपीची आवश्यकता होती, त्यासाठी त्यांनी सिम स्वॅपिंगचा सहारा घेतला.

सिम स्वॅप फसवणूक कसे टाळावे
1. तुमच्या मोबाईल / संगणकावरून नेहमी नेट बँकिंग करा. नेट कॅफे वरून करू नका.
2. चुकूनही सार्वजनिक वायफाय सारख्या रेल्वे स्टेशन, बसस्थानक, सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट, विना पासवर्डचे वायफाय इत्यादींवरून नेट बँकिंगचा वापर करू नका.
3. बँकेच्या किंवा कोणत्याही वेबसाइटच्या URL मध्ये ‘https’ असणे आवश्यक आहे. जर फक्त ‘http’ आहे, p च्या नंतर s नसेल तर या वेबसाइटवर जाऊ नका.
4. बँकेच्या वेबसाइटची URL योग्यरित्या प्रविष्ट करा, तेथे कोणतीही स्पेलिंग मिस्टेक करू नका. मिळते-जुळते किंवा स्पेलिंग मिस्टेक असणारे URL फिसिंग वेबसाइट असू शकतात.
5. URL टाइप करुनच प्रविष्ट करा. कोणत्याही एसएमएस, ईमेल किंवा अन्य वेबसाइटमध्ये दिलेल्या URL वर क्लिक करुन बँकेच्या वेबसाइटवर जाऊ नका.
6. आपल्या मोबाइलमधील प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करा, अन्य कोणत्याही वेबसाइटवरून डाउनलोड करू नका.
7. वैयक्तिक माहिती असलेले ID Card जसे की आधार कार्ड इत्यादींची फोटो कॉपी करताना फोटोच्या प्रती दुकानात राहणार नाही याची खात्री करा.
8. ओटीपी कोणालाही कधीही सांगू नका.