अडीच लाखांची खंडणी दिल्यानंतर पुण्यातील ‘त्या’ व्यावसायिकाची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरीतील विशाल ई-स्क्वेअर येथून सोमवारी रात्री एका व्यवसायिकाचे अपहरण करण्यात आले होते. त्यांच्या सुटकेसाठी अडीच लाखांची खंडणी दिल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे अपहरणकर्त्यांनी एका बँक खात्यात ही रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितली होती.

यज्ञेश विनोद तिलवा (वय ३३, रा. भिगवनकर प्लाझा, रावेत) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी किशोर सावंत, दिलीप अवसरमल व त्यांच्या ३ ते ४ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, तिलवा हे विशाल ई-स्क्वेअर येथील सागर हॉटेल येथे सोमवारी रात्री असताना अपहरणकर्त्यांनी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे अपहरण केले होते. त्यांना टोयाटो गाडीतून बळजबरीने घेऊन गेले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

याची माहिती तिलवा यांच्या नातेवाईकांनी पिंपरी पोलिसांना कळविली. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. अपहरणकर्त्यांशी तिलवा यांचे भाऊ आणि मेव्हणे संपर्कात होते. त्यांनी इतकी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी अडीच लाख रुपये देणे शक्य होईल, असे सांगितले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी कॅनरा बँकेतील एका खात्याचा क्रमांक त्यांना दिला व त्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी त्या खात्यावर मंगळवारी पैसे ट्रान्सफर केले. तरीही अपहरणकर्ते आणखी पैशांची मागणी करीत होते. त्यानंतर रात्री उशिरा तिलवा यांची सुटका करण्यात आली असून पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like