धक्कादायक ! कापड व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून लाखोंची लुट, मॉडेल अन् तिच्या मित्रांवर खंडणीचा FIR

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील एका मॉडेलने बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून येथील एका कापड व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात मॉडेल आणि तिच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अफजल इजहार शेख (वय ३७) यांचा कपड्यांच्या स्क्रॅबचा व्यवसाय आहे. गैबिनगर येथील त्यांचा मित्र इसा अनिस अन्सारी याने अफजल यांची ओळख मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या मुंबईतील एका मैत्रिणीशी करून दिली. दरम्यान तिने अफजल यांना पैशाची अडचण असल्याचे सांगितले. त्यानंतर अफजल यांनी इसा याच्याशी चर्चा करून टप्याटप्याने पाच लाख रुपये दिले. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. दोघांमध्ये शरीरसंबंध सुद्धा झाले. तिने अफजलला मॉडेलिंग क्षेत्रात वेब सिरीजमध्ये २५ लाख गुंतवून महिना पाच लाख कमावण्याचे प्रलोभन दाखवले. मात्र अफजलने यास नकार दिला.

या तरुणीने अफजलशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अफजलने तिला काही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तरुणीने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२०मध्ये अफजलला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात २८ जानेवारी २०२१ मध्ये अफजल व त्याचा मित्र खालिद शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. तरुणीने तक्रार मागे घेण्यासाठी अफजलकडे २० लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तीन लाख रुपये अफजलने मित्राकरवी तरुणीला दिले व उर्वरित रक्कम तक्रार मागे घेतल्यानंतर देतो असे सांगितले मात्र, तिने यास नकार दिला. २० लाख दिल्यानंतरच तक्रार मागे घेईन अशी भूमिका तरुणीने घेतली. त्यानंतर अफजल व त्याचा मित्र खालिद याच्यावर २७ मार्च २०२१ रोजी आंबोली पोलोक ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला तर पैसे उकळल्या प्रकरणी अफजलने तरुणी आणि तिचा मित्र इसा यांच्याविरुद्ध भोईवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार करत आहेत.