आर्थिक वादातून व्यापाऱ्याचे अपहरण, ४ जण अटकेत

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आर्थिक वादातून कळंबा येथील स्टील व्यापाऱ्याचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. पोलिसांनी अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची सुखरुप सुटका करुन चौघांना अटक केली. सुधाकर शिवराम सुळकुडे (वय-६० रा. सुर्वेनगर) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे.

स्वप्निल अशोक सिद्धनाळे (रा. इचलकरंजी), सचिन माणिक चव्हाण (वरची गल्ली, तासगाव) रावजी पोपट मलमे (नागाव निमणी, तासगाव), आकाश सर्जेराव पाटील (पाचवा मैल, निमणी, तासगाव), राजमती सिद्धनाळे (इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. अन्य फरार संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके सांगली, सातारा जिल्ह्याकडे रवाना करण्यात आली आहेत, असे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.

सुधाकर सुळकुडे यांनी स्वप्नील याच्याकडून मोठी रक्कम उसनवार घेतली होती. सुळकुडे यांनी घेतलेल्या रक्कमेपैकी काही रक्कम परत केली होती. उर्वरीत ७० लाख रुपयासाठी स्वप्नील याने त्यांच्याकडे तगादा लावला होता. उर्वरीत रक्कमेसाठी त्याने सुधाकर यांच्याकडे स्थावर मालमत्ता नावावर करुन देण्यासाठी धमकी देण्यास सुरुवात केली होती. बुधवारी सायंकाळी सुळकुडे मोटारीतून घराकडे जात असताना, संशयितांनी त्यांची मोटार रोखली. स्वप्निल व साथीदारांनी मारहाण केली. जबरस्तीने उचलून मोटारीत बसविले. तोंडात कापडाचा बोळा कोंबून उर्वरित रक्‍कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

व्यापार्‍याने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच, संशयितांनी गळ्याला चाकू लावून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तीन महागडे मोबाईल हिसकावून घेऊन त्यांना इचलकरंजी, तासगाव, कवठेमहांकाळ येथे नेऊन अमानुष मारहाण केली. मुलगा स्वप्निल याच्याशी संपर्क साधण्यात आला. सुटकेसाठी पाच लाख रुपयांची रक्‍कम बँकेतून ट्रान्स्फर करण्यास सांगितले. रक्‍कम मिळून वडिलांची सुटका न झाल्याने मुलाने निरीक्षक सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने हालचाली करून व्यापार्‍याची पहाटे सहीसलामत सुटका करून, संशयितांना ताब्यात घेतले.