दमनची दारू महाराष्ट्राची भासवून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दमन राज्यातील विदेशी मद्याच्या बाटल्यांचे लेबल बदलून ते महाराष्ट्रातील असल्याचे भासवून विक्री करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी रात्री सापळा रचून पर्दाफाश करत चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लाख ६४ हजार ९२५ रुपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा, लेबल, इतर साहित्य व दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

आदिनाथ बबन मालपोटे (वय- ३० रा. फळणे, ता. मावळ) समाधान शांताराम लष्करी (वय-२५ रा. वाडेश्‍वर, ता. मावळ), दत्तात्रय लक्ष्मण खेडकर (वय-३२ चाकण), चंद्रकांत दत्तात्रय करपे (वय३९, रा.चाकण ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मावळ तालुक्यातील टाकवे गावच्या शिवारातील ढाब्यावर बनावट विदेशी मद्य घेऊन काहीजण येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या तळेवाग विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने पाळत ठेवून धाब्याजवळ आलेल्या पांढर्‍या रंगाच्या ब्रिझा व सिफ्ट गाडी कारमधून आलेल्या चौघांना एका गाडीतून दुसर्‍या गाडीत मद्याचे चार बॉक्स ठेवत असताना ताब्यात घेतले. दोन्ही वाहनांची झडती घेतली. त्यात ८० मी.ली. क्षमतेचे विविध कंपनीचे ९ विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यावर ते त्यांनी माळवच्या फळणे येथे जाऊन तपासणी केली. तेथे १० हजार २०० बनावट लेबल व बँच क्रमांक टाकण्यासाठी तयार केलेले रबरी शिक्के जप्त केले. तसेच वडेश्‍वर गावात एका गोठ्यातून विदेशी मद्याचे १२ बॉक्स व ३३ बाटल्या जप्त केल्या. तसेच विविध कंपनीचे ३९८० बनावट लेबल, पेपर कटर आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई विभागीय उपायुक्त अर्जून ओहोळ, अधीक्षक डॉ.बी.एच. तडवी, उपअधीक्षक सुनील फुलपगार, संजय पाटील, संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आर.एल. खोत यांच्या पथकाने केली. पथकामध्ये दुय्यम निरीक्षक एन.एन. होलमुखे, आर. ए. दिवसे, अशोक राऊत, जवान बी.एस रणसुरे, बी.एस. राठोड, एस.टी. भरणे यांच्या पथकाने केली.