हँडलर उपलब्ध नसतानाही जर्मन शेफर्ड श्वानची खरेदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

हँडलर म्हणून पोलीस कर्मचारी उपलब्ध नसताना जर्मन शेफर्ड श्वान पिल्लु (बाँड) याच्या खरेदीचा प्रस्ताव ठेवून त्याप्रमाणे श्वानाची खरेदी केल्यानंतर तब्बल साडेचार महिने या श्वानाला हँडलरच नेमला नाही. तसेच जे हँडलर नेमले त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने अशक्त व कुपोषित श्वान प्रशिक्षणास अपात्र ठरल्याचे समोर असले असून त्याला जबाबदार धरुन शहर अपर पोलीस आयुक्तांनी उपनिरीक्षकांसह तिघांना आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बाबुराव जाधव, पोलीस शिपाई नितीन जगताप आणि नितीन गायकवाड अशी त्यांची नावे आहेत.

[amazon_link asins=’B074ZJG743′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7ac5dddc-a8fd-11e8-a9ff-f52b3a485c33′]

पुणे शहर पोलीस दलाचे श्वान पथक शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आहेत. महत्वाच्या गुन्ह्यांमध्ये श्वानामार्फत तपासणी करुन गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार कोठे गेला याचा माग काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी या श्वान पथकातील श्वानांना प्रशिक्षित केले जाते. या पथकातील उपनिरीक्षक प्रदीप जाधव यांनी जर्मन शेफर्ड श्वान पिल्लू (बाँड) याच्या देखभालीसाठी हँडलर उपलब्ध नसताना खरेदीचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार ५ जुलै २०१७ रोजी श्वान खरेदी करण्यात आले. मात्र, त्यानंतर १८ नोव्हेंबर २०१७ पर्यंत त्याच्या देखभालीसाठी हँडलरच नेमला नाही. त्यामुळे या पिल्लाची परिपूर्ण देखभाल, व्यायाम संवर्धन होऊ शकले नाही. त्यामुळे जाधव यांना ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

नितीन जगताप आणि नितीन गायकवाड  यांची १८ नोव्हेंबर २०१७ रोजी हँडलर म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यानंतर ब्राँड या पिल्लाला राजस्थानमधील अलवार जिल्ह्यातील डेरा येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात १३ वी डॉग हँडलर कोर्स श्वान प्रशिक्षण केंद्रात १९ नोव्हेंबर २०१७ रोजी पाठविण्यात आले. तेथील वैद्यकीय तपासणीत ब्राँडचे मागील दोन्ही पाय कुपोषित व अशक्त असल्याने त्याला प्रशिक्षणाकरिता अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये चंदीगडमधील भारत तिबेट सीमा पोलीस कॅम्प येथे होणाऱ्या मुलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्यासाठी ब्राँडची पुण्यातील पशुचिकित्सालयात तपासणी करण्यात आली तेव्हाही तो सक्षम नसल्याचे आढळून आले. त्याची परिपूर्ण देखभाल, व्यायाम, संवर्धन न करता जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले त्यामुळे ब्राँड १० महिन्याचे प्रशिक्षणाकरिता सक्षम होऊ शकला नाही. त्यामुळे नितीन जगताप यांना १० हजार रुपये तर नितीन गायकवाड यांना ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.