आॅनलाईन खरेदी करणाऱ्यांनो सावधान, ‘अशी’ होऊ शकते फसवणूक

आैरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाइन – सध्या सणासुदीचे दिवस आहेत. अनेकजण मोठ्या प्रमाणात आॅनलाईन खरेदी करतात. मात्र अशी खरेदी करताना सावधान राहायला पाहिजे. फिल्पकार्ट आॅनलाईन पोर्टलवरुन खरेदी करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही मात्र एका तरुणाला एक वीट तब्बल ९ हजार रुपयांना पडली आहे. तुम्ही म्हणाल की विट नऊ हजार रुपयांना कशी ? तर ही साधीसुधी विट नसून आॅनलाईन मोबाईल खरेदी केल्यावर त्याजागी मिळालेली विट आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आैरंगाबद येथील हर्सुल परिसरात राहणाऱ्या गजानन खरात या तरुणाने फ्रिलकार्ट या आॅनलाईन पोर्टलवरुन नऊ हजार रुपयांच्या मोबाईलची आॅर्डर केली होती. त्याची रक्कम त्याने क्रेडीट कार्डद्वारे भरली होती. त्यानंतर सात दिवसांनी त्याला पार्सल मिळालं. मोठ्या आनंदात त्याने पार्सल उघडले. मात्र त्या पार्सलमध्ये मोबाईल नसून विट पाहायला मिळाला. या घटनेनंतर त्याने कुरीअर कंपनीला फोन लावला. यात आमची काहीच चूक नसल्याचे म्हणत कुरीअर वाल्यांनी हात झटकले. त्यानंतर फ्लिपकार्ट कंपनीशी संपर्क साधला. त्यांनीही पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. शेवटी गजानन यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन फसवणूक झाली असल्याची तक्रार दिली. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्याच्या इंटरनेट युगात जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्यामुळे ऑनलाइन खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. ३५ टक्क्यांहून अधिक ऑनलाइन व्यवहार ग्राहकांकडून होऊ लागले आहेत. ऑनलाइन खरेदीच्या व्यवहारांबरोबरच ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. ऑनलाइन खरेदीत फसवणूक झालेल्या ग्राहकांना संबंधित कस्टमर केअरकडे तक्रार करता येऊ शकते. तसेच तिथे म्हणणे ऐकून न घेतल्यास ग्राहक मंचाकडे ग्राहक दाद मागू शकतात. गजानन यांची झालेली फसवणूक अनेकांना धडा शिकवणारी आहे. त्यामुळे आॅनलाईन खरेदी करताना सावध राहिले पाहिजे.