पत्नीसोबत भाजी खरेदी करून जाताना कोयत्याने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नीसोबत भाजी खरेदी करून परत असताना आरडा ओरडा करून त्रास देणाऱ्यांना पत्नी सोबत आहे. वेडे चाळे करू नका म्हणून सांगणाऱ्यासोबत वाद घालून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार सय्यदनगर येथे रविवारी घडला. याप्रकरणी चौघांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमान सिद्दीकी उर्फ झरे, शाहरुख उर्फ गणी शेख, मन्या अन्सारी, शाहिद शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर ईस्माईल हसमुख तचरकल (३१, सय्यदनगर) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व हल्लेखोर हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यामध्ये यापुर्वी काही कारणावरू वाद झाले होते. दरम्यान रविवारी दुपारी फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसोबत भाजीपाला खरेदी करून परत जात असताना सलमान सिद्दीकी याने त्यांच्याकडे पाहून आरडा ओऱडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे इस्माईलने त्यांना थांबून असे वेडे चाळे करू नका माझी पत्नी माझ्यासोबत आहे. असे म्हटले. त्यावरून सलमानने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करून त्याच्या साथीदारांसोबत मिळून त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यात ते जखमी झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वरपडे करत आहेत.