‘त्यांच्या’ पाठिंब्यानेच तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झालात, हे विसरू नका ; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ज्या चड्डीवरुन तुम्ही बोलत आहात, त्याच चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला होतात, हे विसरु नका. असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लगावला आहे. शरद पवार यांनी अकलूज येथील सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खाकी ‘चड्डी’वरुन  टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या २३ एप्रिलला होणार आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकलूज येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी. “भाजपमध्ये गेलात, आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल? असा टोला विजयसिंह मोहिते पाटील यांना लगावला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातल्या कुर्डुवाडीत झालेल्या सभेत शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडले. याच चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला होतात. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. इतकेचक नव्हे तर येत्या २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल आहे. आणि निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच कळेल की, कोणाची चड्डी उतरते, असा टोलाही त्यांनी लगावला.