PM मोदींना भेटल्यानंतर CM उध्दव ठाकरेंनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘CAA ला घाबरण्याचं कारण नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीतील नेत्यांच्या भेटीला गेले आहेत. दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘सीएए’ या देशभरात वादग्रस्त ठरलेल्या कायद्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी कोणालाही सीएएला घाबरण्याचे कारण नाही असे सांगत आपला सीएएला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी आज पंतप्रधानांशी सीएए, एनआरसी आणि एनपीआरवर चर्चा केली. मी यापूर्वीच यासंबंधी माझी भूमिका स्पष्ट केली होती, कोणालाही सीएएला घाबरण्याचे कारण नाही.”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “सीएए कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व काढून घेणार नाही, या कायद्याद्वारे शेजारील देशातील अल्पसंख्यांक असलेल्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल. एनपीआरमध्ये काही गडबड असल्यास त्यावेळी निर्णय घेऊ, तसेच एनआरसी देशात लागू होणार नाही असेही सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाही.”

दिल्ली दौऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी उद्धव ठाकरेंसह शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सीएए, एनआरसी, एनपीआर, जीएसटी, राज्याचा निधी, शेतकरी अशा विविध विषयांवर जवळपास सव्वा तास चर्चा झाली. राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये कोणताही वाद नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले