CAA : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा ‘तो’ व्हिडीओ भाजपाकडून ‘व्हायरल’, काँग्रेसची ‘गोची’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशातील वातावरण आंदोलनांनी ढवळून निघाले आहे. तसेच विविध कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशातील विविध भागात आंदोलन पुकारले आहे. तसेच डाव्या पक्षांनी देखील भारत बंदचं आवाहन केलं आहे. त्याला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. या दरम्यान भाजपाकडून काँग्रेसला घेरण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा जुना व्हिडीओ समोर आणला जात आहे. २००३ मध्ये राज्यसभेत मनमोहन सिंग बोलत असतानाचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे.

२००३ मध्ये केंद्रात भाजपाचे सरकार होते आणि या सरकारची धुरा अटलबिहारी वाजपेयी यांच्या हातात होती. त्यावेळी मनमोहन सिंग हे राज्यसभेचे सदस्य होते. तेव्हा मनमोहन सिंग यांनी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्यावर टीका करताना वक्तव्य केले होते की, बांग्लादेशात धार्मिकतेमुळे हिंसा झालेल्या शरणार्थींबाबत सरकारला सहानभूतीपूर्वक विचार करावा लागेल. कारण इतर देशातून आलेल्या शरणार्थी लोकांचे दुःख हे केंद्र सरकारने समजून घ्यावे. बांग्लादेशात मोठ्या प्रमाणावर धार्मिक हिंसाचार आणि अत्याचार होत आहेत. जर हे शरणार्थी भारतीय म्हणून जर आपल्या देशात येत असतील तर त्यांचा सांभाळ करणे हे आपले दायित्व आहे. त्यामुळे सरकारने नागरिकत्व सुधारणा विधेयकाकडे लक्ष द्यावं आणि याकडे गंभीरतेने बघावे अशी मागणी डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत केली होती.

सध्या काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात धार्मिक मुद्द्यावरुन नागरिकत्व देण्याचा विरोध करत भाजपावर टीका होत आहे. अशावेळी काँग्रेसला उत्तर म्हणून भाजपाकडून काँग्रेसचे जुने व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहेत. भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरुन डॉ. मनमोहन सिंग यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून काँग्रेस आणि भाजपात या विधेयकावरून जुंपली आहे.

नागरिकत्व कायद्याला भारतात अनेक राज्यातून विरोध होत असून उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र अशा विविध राज्यांत मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. या अनुषंगाने दिल्लीमधील जवळपास १४ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत. तसेच लाल किला, जामा मशीद, चांदणी चौक आणि विश्वविद्यालयातील प्रवेशद्वार देखील बंद करण्यात आले आहेत. परिणामी, दिल्लीत बऱ्याच ठिकाणी हिंसक प्रदर्शन झाल्याने जामिया मिलिया इस्लामिया, जसोला विहार, शाहीन बाग आणि मुनिरका स्टेशनांवरही ट्रेन थांबवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार डावे पक्ष रामलीलापासून लेडी ब्रेबॉर्न कॉलेजपर्यंत मोर्चा काढणार आहेत. तर बुद्धिजिवी वर्गाकडून रामलीला मैदान ते हॉग मार्केटपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. देशातील हे हिंसक वातावरण कधी शमते याबाबत तूर्तास तरी अंदाज घेणे अवघड आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/