राज्यमंत्रिमंडळ विस्तार : ‘वजन’दार मंत्रीपदाची अपेक्षा बाळगणार्‍यांना मिळणार ‘गाजर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  येत्या १७ जूनला पावसाळी अधिवेशन सुरु  होणार असले तरी फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला ‘खो ‘ कशासाठी घातला यापेक्षा आम्ही काँग्रेसचे नाराज भाजपात आणूनही आम्हाला  ‘गाजर’ का दाखवले हा मुद्दा गाजण्याची दाट शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेलेल्या गिरीश बापट यांच्याकडे असणाऱ्या खात्यांचे वाटप अन्य मंत्र्यांकडे तसेच  पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांनी नियुक्ती केल्याने राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचे बोलले जात आहे. फडणवीस सरकारने यापूर्वी राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार करण्याचे जाहीर केले होते मात्र आता अचानक अनेक खात्यांचे वाटप अन्य मंत्र्यांकडे केल्याने मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा केवळ ‘गाजर’ होते कि, लोकसभा निवडणुकीसाठी आमिषांची व्युव्हरचना हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

असे असले तरी लोकसभा निवडणुकीत ज्या दिग्गजांनी प्रवेश घेऊन महायुतीला हातभार लावला, तेही मोठ्या ‘संधी’ ची अपेक्षा बाळगून आहेत; पण त्यांना संधी दिली तर पक्षांतर्गत असंतोष निर्माण होईल यामुळेच अधिवेशनाला केवळ काही दिवस असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी घाई-घाईने केलेले खात्यांचे वाटप पाहता मंत्रिमंडळाचा विस्तार अशक्य असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता काळ लक्षात घेता, तारेवरची कसरत ठरणार  आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रयोग नाराजीचा ठरू शकतो आणि त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसू शकतो.

त्यामुळे केवळ तीन महिन्यांसाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यापेक्षा आहे त्या स्थितीत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा पवित्रा भाजपचा असल्याचे बोलले जात असून त्याला शिवसेनेची सहमती असल्याचेही सांगितले जात आहे.परिणामी स्वतः भाजपात प्रवेश करून  काँग्रेसमधील नाराज आमदारांना भाजपमध्ये आणण्याची ‘कामगिरी’  बजावून त्याबदल्यात वजनदार मंत्री पद  मागणाऱ्यांना शेवटी ‘गाजर’ मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.