देशात ३ नव्या ‘एम्स’ला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात ३ ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) उभारण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन तर गुजरातमध्ये एका एम्सला मंजुरी देण्यात आली आहे.

देशभरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी देशात ३ ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक नव्या एम्समध्ये १०० एमबीबीएस, ६० बीएससी नर्सिंग आणि १५ ते २० सुपर स्पेशालिटी विभाग असतील. तसेच ७५० बेडची सोय करण्यात येणार आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सबकी साथ, सबका विकास’ ध्येय आहे. त्या धोरणाचा भाग म्हणून देशात तीन नव्या एम्सची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान विकास निधीतून जम्मू आणि काश्मीर विभागांत प्रत्येकी एक एम्स उभारण्यात येणार आहे. तर गुजरातमधील राजकोटच्या एम्ससाठी अर्थ मंत्र्यांनी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

त्रिमंडळ बैठकीत जम्मू विभागात विजयनगर, काश्मीरमध्ये पुलवामातील अवंतीपुरा आणि गुजरातमध्ये राजकोट येथे नव्या एम्स उभारणीस मान्यता दिली. जम्मूसाठी १६६१ कोटी, काश्मीरसाठी १८२८ कोटी आणि राजकोटसाठी (गुजरात) ११९५  कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.