Cabinet Expansion | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाताच, आमदारांना लागले मंत्रीपदाचे वेध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जवळपास गेल्या चार महिन्यांपासून प्रतिक्षा असलेल्या राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराला (Cabinet Expansion) अखेर मुहूर्त मिळू शकतो असे बोलले जात आहे. नुकतचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यावरून मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांमध्ये सुरू झाली आहे. त्यावर बुलढाण्याचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रतिक्रिया देत मंत्रीमंडळ विस्तारावर (Cabinet Expansion) निर्णय होणार असल्याचे सुतोवाच केले. मात्र, दिल्ली येथील बैठक आटोपल्यानंतर ही बैठक राज्यातील साखर उद्योगांबाबत असल्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आणि मंत्रीमंडळ विस्ताराबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

मंत्रिमंडळ विस्ताराला अगोदरच खूप उशीर झाला असून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाअगोदर मंत्रीमंडळ विस्तार करण्याचे सांगितले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकत्र दिल्ली दौरा केल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी बैठक पार पडल्यानंतर विस्ताराचा निर्णय लगेच येईल, असे वक्तव्य केले होते.

दरम्यान, राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) दुसऱ्या टप्प्यातील विस्तारासाठी अनेक आमदार इच्छुक असून त्यांना लवकरात लवकर मंत्रीमंडळ विस्ताराची अपेक्षा आहे.

तर, दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील साखर उद्योगाचे प्रश्न समजून घेतल्याबद्दल केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे आभार मानले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘आम्ही अमित शहा यांचे आभार मानतो. अतिशय तातडीची बैठक त्यांनी महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या संदर्भात घेतली. साखर उद्योगामध्ये असलेल्या अडचणी आणि त्यांना सशक्त करण्याच्या योजना यावर अतिशय सकारात्मक चर्चा झाली. आठवडाभरात चांगला निर्णय होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योजक, शेतकरी यांना सर्वांना दिलासा मिळेल. साखर उद्योग सक्षम झाला पाहिजे. या उद्देशाने बैठक झाली.’ असे यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यावर स्पष्टीकरण दिल्यानंतर आता रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? याविषयीची उत्सुकता आमदारांना लागली आहे.

Web Title :- Cabinet Expansion | cabinet expansion chief minister deputy chief minister mlas as soon as they go to- delhi