… म्हणून रखडला मंत्रिमंडळाचा विस्तार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्तासंघर्षाचा पेच सुटून राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकूण 6 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र या तिन्ही पक्षातील खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार केवळ आमदार फुटीच्या भितीने रखडला का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह सर्वाधिक 16 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह 15 मंत्रिपदे येतील. तर काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळतील. मात्र शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत गृह खात्यावरून एकमत होत नाही अशी माहिती मिळाली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री पदावरून गोंधळ झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या अजित पवार यांना ही जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा सुरु आहे. तसेच जयंत पाटील हेही या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहेत. अजित पवारांनी केलेलं बंड पाहता त्यांना मंत्रिपद देण्याचे सर्वाधिकार शरद पवारांना देण्यात आले आहेत. मात्र शरद पवार सध्या संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत.

तसेच मंत्रीपद निश्चित करण्यात काँग्रेससमोर पेच असून अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणतं मंत्रीपदं द्यायचा याविषयी काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यांसारख्या कारणांमुळेही मंत्रिमंडळाचा विस्तार लांबलेला आहे. मंत्रीपदावरून आमदार फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे मंत्रीमंडळविस्तार मागे ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Visit : Policenama.com