मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांना PM मोदींनी ऐतिहासिक असल्याचं सांगितलं, कॅबिनेटनं घेतले ‘हे’ 5 मोठे निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी, पीएम मोदी यांनी मंत्रिमंडळातील निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगत म्हंटले की, या निर्णयाचा कोट्यावधी भारतीयांना फायदा होईल. या बैठकीत अवकाश क्षेत्रात सुधारणा, सहकारी बँकांवर देखरेख, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळास मंजुरी आणि शिशु लोनवर 2% व्याज सूट देण्याचे निर्णय घेण्यात आले. जाऊन घेऊया, केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांसंदर्भात..

1 – सहकारी बँक आता आरबीआयच्या देखरेखीखाली

आता देशातील सर्व सहकारी बँका (मग ती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक असो वा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक) रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली येईल. सध्या देशात 1482 अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका आणि 58 मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँका आहेत. या बँका आरबीआयच्या देखरेखीखाली आल्यानंतर 8.6 कोटीहून अधिक ठेवीदारांना विश्वास मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे. बँकांमध्ये जमा केलेले त्यांचे 4.84 लाख कोटी रुपये सुरक्षित आहेत, असे आश्वासन दिले जाईल.

2. शिशु मुद्रा कर्जावर 2 टक्के व्याज सूट

मोदी सरकारने शिशु मुद्रा लोनधारकांना दिलासा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी या कर्जावरील 2% व्याज सवलतीला मान्यता दिली. 20 लाख कोटींच्या मदत पॅकेजचा भाग म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याची घोषणा केली होती. मंत्रिमंडळाच्या निर्णयासंदर्भात सांगताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, “मुद्राच्या शिशु कर्जावर 2 टक्के व्याज सूट देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. लाखो लाभार्थ्यांना आता 2 टक्के व्याज सवलत मिळणार आहे.

3 – अवकाश क्षेत्र आता खासगी कंपन्यांसाठी खुले

अवकाश जगाच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेत नरेंद्र मोदी सरकारने विद्यार्थी आणि खासगी कंपन्यांसाठी भारताचे अवकाश क्षेत्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. अवकाश क्रियाकलापांच्या सर्व क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या सहभागास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अंतराळ क्षेत्रात दूरगामी सुधारणांना मान्यता दिली.

4- कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळास मंजूरी

उत्तर प्रदेशच्या कुशीनगर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, या निर्णयामुळे परदेशात राहणाऱ्या बौद्ध धर्माच्या अनुयायांना कुशीनगरला येणे सोपे होईल. थायलंड, जपान, व्हिएतनाम, श्रीलंका यासारख्या देशांतील अनेक अनुयायांना इथे येण्याची इच्छा आहे. कुशीनगर हे महात्मा बुद्धाचे निर्वाण स्थळ आहे, त्यामुळे आता ते आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून विकसित केले जाईल.

5 – पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी

अर्थविषयक मंत्रिमंडळाच्या समितीने 15,000 कोटी रुपयांच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (एएचआयडीएफ) ची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे आपल्या कष्टकरी शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होईल असे पंतप्रधान म्हणाले. विशेषत: दुग्धशाळांमध्ये गुंतवणूक आणि प्रादेशिक पायाभूत सुविधांना प्रोत्साहन मिळेल.