कॅब बुक करून पती पत्नीने केले कॅबचालकाचे तुकडे

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – मोबाईल एपवर कॅब बुक करून कॅबचालकाचे अपहरण करत त्याला लुटून खून केला. त्यानंतर त्याचे तुकडे करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार नवी दिल्लीत उघडकिस आला. याप्रकरणी पती पत्नीसह एकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

राम गोविंद (२८) असे खून झालेल्या कॅबचालकाचे नाव आहे. फरहत अली और आणि सीमा शर्मा उर्फ असलम खातून अशी अटक केलेल्या पती पत्नीची नावे आहेत.

२९ जानेवारी रोजी राम गोविंदच्या पत्नीने तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती.तो २८ जानेवारीच्या रात्रीपासून बेपत्ता होता. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटिव्ही फुटेज आणि मोबाईलचे लोकेशन तपासले. त्यानंतर कॅब मदनगीर ते कापसहेडा बॉर्डरकडे जाण्यासाठी शेवटची बुक केल्याचे समोर आले. त्यानंतर जीपीएसने काम करणे बंद केले होते. तेथील सीसीटिव्ही तपासल्यावर त्यात दोघे पती पत्नी दिसले. त्यानंतर तांत्रिक तपासानंतर पोलीस फरहत अली और आणि सीमा शर्मा उर्फ असलम खातून या दोघांपर्यंत पोलीस पोहोचले. दोघांना अटक करण्यात आली. त्यांनी खुनाची कबूली दिली.

२९ जानेवारी रोजी दोघांनी कॅब बुक केली. त्यानंतर त्याला गाजियाबाद येथे नेऊन गुंगीचे औषध टाकलेला चहा पाजविण्यात आला. तो बेशुद्ध झाल्यावर त्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याला गाजियाबाद येथील घरात आणून त्याचा मृतदेह घरात ठेवला आणि कार घेऊन मुरादाबादकडे गेले. तेथे सुरक्षित ठिकाणी कार सोडून दोघे कटर आणि वस्तरा घेऊन घरी आले. त्यानंतर दोघांनी राम गोविंदच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यांची विल्हेवाट लावली. पोलिसांना त्याचे तुकडे ग्रेटर नोयडाजवळून मिळाले आहेत.