लॉकडाउनमध्येही ‘परिवहन’विभागाला 34 कोटींचा महसूल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन असतानाही बीएस-4 मानक असलेल्या 21 हजार वाहनांची नोंदणी राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. यामुळे परिवहन विभागाला 34 कोटी 77 लाख रुपये महसुल मिळाला आहे. सोलापूर, मुंबई (चार आरटीओ), वसई, ठाणे, पुणे, प्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्वाधिक नोंद झाल्याची माहिती देण्यात आली.

भारत स्टेज इंधनाची गुणवत्ता आणि वाहनातून निघणार्‍या धुराबाबत कायदा पाळणे वाहन कंपन्यांना बंधनकारक आहे. त्यामुळेच प्रदुषमुक्तीसाठी वाहनांना बीएस-4 हे नवीन मानक अनिवार्य करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने बीएस-4 प्रकारातील वाहनांची विक्री 1 एप्रिल 2020 पर्यंत बंद करण्याचे आदेश ऑक्टोबर 2018 ला दिले होते. परंतु कोरोनाच्या पाश्र्वाभूमीवर लागलेल्या टाळेबंदीमुळे बीएस-4 वाहनांच्या नोंदणीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

या शेवटच्या दिवशी राज्यातील 52 प्रादेशिक परिवहन आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 11 हजार 219 वाहनांची नोंद झाली आणि 11 कोटी 19 लाख 88 हजार रुपये महसुल राज्याला मिळाला. 25 मार्चपासून लॉकडाउन सुरु झाल्यामुळे विविधि आरटीओतील कामकाजही ठप्पच झाले. 14 एप्रिलपर्यंत असलेली टाळेबंदी नंतर शिथिल होईल, असे वाटत होते.

परंतु तसे न झाल्याने आरटीओने ऑनलाईन वाहन नोंदणी प्रक्रि येला सुरूवात केली. एप्रिल महिन्यात एकूण 21 हजार 535 वाहनांची नोंद होतानाच 34 कोटी 77 लाख रुपयांचा महसुल मिळाला आहे. मार्च महिन्यात 2 लाख 68 हजार 200 वाहनांची नोंद झाली होती आणि 603 कोटी रुपये महसुल मिळाला होता.