सीआयडी विरोधात हक्कभंग आणणार : धनंजय मुंडे यांचा इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासाच्या चौकशीचा आदेश सरकारने दिल्यानंतरही ‘सीआयडी’ चौकशी करीत नाही. हा विधिमंडळाचा हक्कभंग आहे. नगर जिल्ह्यातील या प्रकाराबाबत हक्कभंग आणणार आहे, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

पाथर्डी येथील पत्रकार हरिहर गर्जे व सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांच्याविरोधात व्यक्तीद्वेषातून खोट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व विजय आव्हाड यांच्यात मोबाईल फोनवरून झालेल्या संभाषणाची एक ऑडीओ क्लिप १४ फेब्रुवारी २०१८ रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामध्ये खोट्या गुन्ह्यात पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना अडकविले जात असल्याचे समोर आले. याप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गर्जे, आव्हाड यांच्यावरील दाखल गुन्हे व व्हायरल क्लिपबाबत सीआयडीकडे तपास देण्याचे तसेच खोट गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. हा गुन्हा वर्ग होऊन वर्ष लोटले तरी या प्रकरणात सीआयडीने काहीच तपास केला नसल्याचे समोर आले आहे.

याबाबत मुंडे म्हणाले, अधिवेशनात गृहराज्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही सीआयडीने या प्रकरणाचा अद्यापपर्यंत तपास केलेला नाही. ही बाब गंभीर आहे. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कारवाई न झाल्यास सीआयडी विरोधात हक्कभंग दाखल करणार आहे. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या बाबतीतही हे सरकार बेफिकीर असेल तर सामान्य जनतेची काय अवस्था असेल. या प्रकरणाचा तातडीने तपास न झाल्यास पुन्हा अधिवेशनात आवाज उठविण्यात येईल.

सीआयडी पोलिसांना पाठीशी घालत आहे का ?
कुठल्याही प्रकरणाचा निरपेक्ष आणि तातडीने तपास होण्यासाठी सीआयडीकडे गुन्हा वर्ग करण्याची मागणी केली जाते. पाथर्डी प्रकरणाच्या तपासात मात्र सीआयडीचे तपासी अधिकारी दिरंगाई करतांना दिसत आहेत. गेल्या वर्षभरात पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या आवाजाचा नमुनाही अधिकाऱ्यांनी घेतलेला नाही. यावरून सीआयडीचे अधिकारी निरीक्षक चव्हाण यांना पाठीशी घालत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.