भारतीय Zydus Cadila कंपनीनं लॉन्च केलं सर्वात स्वस्त ‘कोरोना’चं औषध, जाणून घ्या किंमत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   इबोला निर्मूलनासाठी वापरण्यात येत असलेले रेमडेसिव्हीर कोरोनावर प्रभावी ठरतं असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आणि किंमतही जास्त असल्याने सामान्य नागरिकास परवडेनासे झाले. आता फार्मा कंपनी झायडस कॅडिलाने (Zydus Cadila) गिलियाड सायन्सेस अँटीवायरल औषध रेमडेसिव्हीरचे सर्वात स्वस्त जेनेरिक औषध लाँच केले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, झायडसने १००mg औषधाची किंमत २८०० रुपये ठेवून हे औषध लाँच केलं आहे. जगभरातील बऱ्याच ठिकाणी केलेल्या अभ्यासादरम्यान रेमडेसिव्हीर कोरोना रुग्णांवर उपायकारक असल्याचं सिद्ध झाले. रेमडेसिव्हीर मुळे कोरोना रुग्णांच्या लक्षणांचा कालावधी १५ दिवसांवरुन ११ दिवस होऊ शकतो. परिणामी रेमडेसिव्हीरची मागणी वाढली. पण तज्ज्ञांनी असाही इशारा दिला की हे प्रभावी उपचार नाही. मात्र कोणतेही औषध नसताना डॉक्टर जास्त लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी हे औषध लिहून देतात. त्यामुळे दिल्ली आणि भारतातील इतर ठिकाणी त्याची मागणी वाढली असून, त्याचा काळाबाजार देखील सुरु झाला आहे.

दरम्यान, आता भारतातील सिप्ला, जुबिलंट लाइफ, हेटरो ड्रग्स आणि मायलोन यांना हे औषध भारतात तयार करण्याची परवानगी दिली आहे. दुसरीकडे Zydus Cadila ने आपली कोव्हि़ड-१९ लस ZyCoV-D ची मानवी चाचणी सुरू केली आहे. कंपनीने सांगितल्यानुसार, देशातील विविध भागांतील १००० लोकांवर ही चाचणी करण्यात येणार असून, ZyCoV-D च्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. या मल्टिसेंट्रीक अभ्यासात लशीची सुरक्षा, कोरोना संसर्ग विरुद्ध लढण्यासाठी लागणारी रोगप्रतिकारशक्ती आणि प्रतिरक्षाजनकतिची चाचणी करण्यात येईल.