राफेलवरील कॅग अहवाल राष्ट्रपतींकडे सादर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेल कराराच्या मुद्द्यावरून अनेक विरोधी पक्षांनी केंद्राला घेरल्याचं चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे राफेल करारातील कथित अनियमिततेवरून काँग्रेसकडून केंद्र सरकारवर सातत्याने आरोप होताना दिसत आहे. अशातच आता नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी आपला अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवला आहे, अशी माहिती समोर आली आहे. या करारासंदर्भातील कॅग अहवाल संसदेत मांडला जाण्याची अनेक जण वाट पाहात आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारीच कॅगने आपला अहवाल अधिकृतपणे राष्ट्रपती भवनाकडे पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  काही आठवड्यांपूर्वी संरक्षण मंत्रालयाने राफेलवर आपले विस्तृत उत्तर कॅगला पाठवले होते. खरेदी प्रक्रियेसह ३६ राफेल विमानांची किंमतही यात सांगितलेली होती. कॅगने राफेल प्रकरणी १२ प्रकरणांचा विस्तृत अहवाल तयार केल्याचे समजत आहे. कॅग आपल्या अहवालाची एक प्रत राष्ट्रपती आणि दुसरी प्रत अर्थ मंत्रालयाला पाठवते.

समोर आलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सत्र बुधवारी संपत आहे. त्यामुळे मंगळवारी किंवा बुधवारी राफेलवरील कॅग अहवाल संसदेत पटलावर ठेवला जाऊ शकतो. कॅगचा अहवाल प्रोटोकॉलनुसार सर्वात आधी राष्ट्रपतींना पाठवण्यात आला आहे. यानंतर आता कॅग अहवाल राष्ट्रपती भवनातून  लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात आणि राज्यसभेच्या सभापतींच्या कार्यालयात पाठवण्यात येईल असे समजत आहे.