रक्षाबंधनला चीनला बसणार 4 हजार कोटींचा फटका !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशातील सर्वात मोठी व्यापारी संघटना असणार्‍या ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने आता रक्षाबंधन हे पूर्णपणे भारतीय राखी वापरुनच साजरे करण्याचे आवाहन केले आहे. कोणीही चिनी मालापासून बनवलेल्या राख्या वापरु नयेत. ‘भारतीय सामान आमचा अभिमान’ या मोहिमेअंतर्गत 10 जूनपासून कैटकडून बहुआयामी राष्ट्रीय मोहीम सुरु करण्यात आली आहे. ही मोहीम सुरु केल्यानंतर रक्षाबंधन हा पहिला मोठा सण असेल ज्यामुळे चिनी उत्पादकांना 4 हजार कोटींचा आर्थिक फटका बसणार आहे.

दरवर्षी देशात रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर 6 हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल राखी उद्योगामध्ये होते. त्यापैकी केवळ चिनी राख्यांची बाजारपेठ ही चार हजार कोटींची आहे. रक्षाबंधनच्या पारश्वभूमीवर चीनमधून या राख्या भारतामध्ये येतात. फोम, कागद, राखी धागा, मोती आणि राखीवरील सजावटीचे बरेचसे सामानही चीनमधून आयात होते.

मात्र यंदा भारत आणि चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही आयात न करण्याचा निर्णयाच कैटने घेतला आहे. यंदाची राखी ही पूर्णपणे भारतीय असावी असा आग्रह कैटचा आहे. त्यामुळेच चिनी मालाचा वापर करुन राख्या बनवू नयेत आणि त्यांच्या व्यवसायही करु नये असे व्यापार्‍यांनी केले आहे.