WhatsApp आणि Facebook च्या पॉलिसीविरूद्ध उतरले व्यापारी, अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची मागणी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएटी) या व्यापार्‍यांच्या संघटनेने व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर कडक आक्षेप घेतला आहे, ज्याद्वारे व्हॉट्सअ‍ॅप(WhatsApp )वापरणार्‍या व्यक्तीचा सर्व प्रकारचा डेटा, पेमेंट ट्रान्झॅक्शन, संपर्क, स्थान आणि इतर महत्वाची माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन पॉलिसीद्वारे मिळवून ती आपल्या कोणत्याही हेतूसाठी वापरू शकते. यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांना पाठवलेल्या पत्रात कॅटने मागणी केली आहे की, सरकारने नवीन गोपनीयता धोरण राबविण्यापासून व्हॉट्सअ‍ॅपला त्वरित रोखावे किंवा व्हॉट्सअ‍ॅप आणि त्याच्या मूळ कंपनी फेसबुकवर त्वरित बंदी घालावी. भारतात फेसबुकचे 20 कोटीहून अधिक वापरकर्ते आहेत आणि कंपनी स्वत: च्या धोरणाद्वारे प्रत्येक वापरकर्त्याचा डेटा जबरदस्तीने मिळवल्याने केवळ अर्थव्यवस्थाच नव्हे तर देशाच्या सुरक्षेसाठीही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

सांगितले ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे व्यवहार :

कॅटने एका निवेदनात म्हंटले, हे आम्हाला ईस्ट इंडिया कंपनीच्या त्या दिवसांची आठवण करून देते, जेव्हा या कंपनीने केवळ मिठाच्या वापरासाठी भारतात प्रवेश केला होता आणि देश गुलाम झाला होता, परंतु सध्याच्या काळात डेटाच देशाची अर्थव्यवस्था आणि सामाजिक संरचनेसाठी महत्वाचे आहे. भारतीयांना विनाशुल्क फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याची पहिली सुविधा देण्यामागील त्यांचा खरा हेतू आता समोर येत आहे. प्रत्येक भारतीयांचा डेटा मिळविणे आणि त्याच्या लपलेल्या अजेंड्यासह भारताचा व्यवसाय आणि अर्थव्यवस्था नियंत्रित करणे हे त्यांचे लक्ष्य आहे.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की व्हॉट्सअ‍ॅपचे बदललेले गोपनीयता धोरण हे एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेचे अतिक्रमण असून ते भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहेत आणि म्हणूनच या विषयावर सरकारकडून त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी कॅटने केली आहे. भारतीया आणि खंडेलवाल म्हणाले की, त्यांच्या नवीन गोपनीयता धोरणात व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यास नवीन अटी स्वीकारण्यास भाग पाडत आहे आणि बहुतेकदा असे दिसून येते की, अटी न वाचता बरेच लोक केवळ सामान्य व्यवस्था समजून अटी स्वीकारतात आणि त्यांना माहित नसते कि, त्यांनी स्वत: साठी कोणती समस्या ओढवून घेतली आहे. जर एखाद्या व्यक्तीने सुधारित अटी स्वीकारल्या नाहीत तर अशा परिस्थितीत तो व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकत नाही. ते म्हणाले की, ही व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरही घुसखोरी आहे. भारतात कार्यरत कंपनी वापरकर्त्यांना त्याच्या मनमानी आणि एकतर्फी अटी मान्य करण्यास कसे भाग पाडेल? दोन्ही व्यावसायिक नेत्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. नवीन नियमांची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून होईल.

वापरकर्त्यांच्या प्रत्येक कृतीवर असणार व्हॉट्सअ‍ॅपची नजर

ते म्हणाले की, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कोणत्याही वापरकर्त्याच्या फोनचे लोकेशन, युजेस आणि मॉडेलची माहिती सहज मिळू शकते, एवढेच नाही तर नवीन पॉलिसीद्वारे व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्याच्या बँक खात्यातही प्रवेश करू शकेल. इतकेच नाही तर व्हॉट्सअ‍ॅपवरुन हेही कळेल की वापरकर्त्याने कोणाला व किती पैसे दिले आहेत, तसेच वापरकर्त्याने काय विकत घेतले आहे आणि त्याची डिलिव्हरी कुठे केली जात आहे यासारखी अन्य माहितीदेखील सहज मिळू शकेल. हे प्रत्येक वापरकर्त्याचा मागोवा घेऊ शकतो. इतका मोठा डेटा मिळविल्यानंतर ते वापरकर्त्यांची खरेदी आणि खर्च करण्याच्या व्यवहारासोबत, ते काय खातात, विविध वस्तूंच्या आवश्यकतेचे प्रमाण, प्रवास आणि गंतव्यस्थान, उड्डाण, रेल्वे, टॅक्सी, रस्ते वाहतूक इत्यादींची अचूक माहिती मिळविण्यात सक्षम होईल.