मागील 5 महिन्यात Retail Sector चे झाले 19 लाख कोटी रूपयांचे नुकसान, 20% दुकाने होणार बंद

नवी दिल्ली : व्यापारी संघटना कॅट (सीएआयटी) ने दावा केला आहे की, देशात कोरोना महामारीमुळे मागील 5 महिन्यात भारतातील किरकोळ व्यापाराचे सुमारे 19 लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. ज्यामुळे व्यापार्‍यांना तोट्याचा सामना करावा लागला. स्थानिक व्यापारात उलथा-पालथीचा परिणाम अजूनही कायम असून लॉकडाऊन उघडल्याच्या 3 महिन्यानंतर सुद्धा देशात व्यापारी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. दुकाने उघडण्याची परवानगी तर मिळाली, परंतु ग्राहकांशिवाय दुकाने ओस पडली आहेत किंवा कमी ग्राहक दुकानापर्यंत पोहचत आहेत.

तर दुसरीकडे ई-कॉमर्स कंपन्या परवानगी नसलेल्या सर्व पद्धतींचा अवलंब करत आहेत, ज्यामुळे किरकोळ व्यापारी व्यापाराच्या बाहेर फेकले जात आहेत. कॅटचा दावा आहे की, रिटेल बाजारात पैशाचे संकट अजूनही कायम आहे. नोव्हेंबर-डिसेंबरच्या दिलेल्या मालाचे पैसे जे फेब्रुवारी-मार्चपर्यंत आले पाहिजे होते ते पैसे अजूनपर्यंत बाजारात येऊ शकलेले नाहीत. ज्यामुळे छोट्या व्यापार्‍यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने दिल्ली, मुंबई, कलकत्ता, हैद्राबाद, चेन्नई, नागपुर, रायपुर, भुवनेश्वर, रांची, भोपाळ, सूरत, लखनऊ, कानपुर, जम्मू, कोचीन, पाटणा, लुधियाना, चंडीगढ, अहमदाबाद, गुवाहाटी या 20 शहरातील व्यापार्‍यांच्या नुकसानीच्या आकडा या शहरांशी चर्चा करून घेतला आहे, आणि त्या आधारे हा रिपोर्ट तयार केला आहे.

सुमारे 20 टक्के दुकानांना टाळे लागण्याची भिती
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीय आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले की, देशात स्थानिक व्यापार सर्वात खराब काळातून जात आहे. रिटेल व्यापारावर चारही बाजूंनी मारा होत आहे. जर लवकरात लवकर स्थिती सुधारण्यासाठी पावले उचलली गेली नाहीत तर देशभरात 20% दुकाने नाईलाजाने बंद करावी लागतील. यामुळे बेरोजगारांची संख्या वाढू शकते.

व्यापार्‍यांना कोणत्या महिन्यात किती तोटा
कोविड 19 मुळे देशातील स्थानिक व्यापाराला एप्रिलमध्ये सुमारे 5 लाख कोटीचे नुकसान झाले. तर मे महिन्यात सुमारे साडेचार लाख कोटी रूपये, जून महिन्यात लॉकडाऊन उठवल्यानंतर जवळपास 4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. जुलैमध्ये जवळपास 3 लाख कोटी आणि ऑगस्टमध्ये 2 .5 लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.

या कारणांमुळे किरकोळ बाजारात शांतता
भितीमुळे लोक बाजारात येण्यास घाबरत आहेत. याशिवाय एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था, रेल्वेची उपलब्धता नसल्याने सुद्धा घाऊक बाजारात शांतता आहे. दिल्लीत रोज 5 लाख व्यापारी देशाच्या अन्य राज्यातून येत होते परंतु यापैकी बहुतांश व्यापारी किंवा ग्राहक येत नाहीत.

व्यापार्‍यांचे अर्थमंत्र्यांना आवाहन
व्यापारी संघटना कॅटने केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना आवाहन केले आहे की, त्यांनी व्यापार्‍यांच्या सध्याच्या स्थितीवर पावले उचलावीत. जर देशात 20 टक्के दुकाने बंद झाली तर याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. केंद्रच नव्हे राज्य सरकारांची आर्थिक बजेट प्रभावित होतील. कॅटने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना आवाहन केले आहे की, या संकटात बँकांकडून व्याज वसूल करण्यासाठी दबाव टाकला जाऊ नये आणि दंड आकारला जाऊ नये. सरकारने यावर निर्देश दिले पाहिजेत.