Pune : कोयत्याने केक कापणे पडले महागात; ‘बर्थडे बॉय’सह दोघांवर FIR

पोलीसनामा ऑनलाइन : कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. दापोडी येथील या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी उशिरा का होईना गुन्हा दाखल करून घेतला आहे. मात्र, अद्याप मुख्य आरोपी फरार आहे, तर त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.

समीर सियाज बागसिराज (20, रा. दापोडी) याला अटक केली आहे, तर सोहेल शेख हा मुख्य आरोपी फरार आहे. गुन्हेगारीवर आधारित असलेल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटात कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे आपण पाहिले आहे. याचाच प्रत्यय वारंवार सध्या पिंपरी-चिंचवड शहरात येत आहे. ‘भाई का बड्डे’ असं म्हणत तरुण कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करताना दिसून येत आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी यावर कडक पाऊल उचलण्याची ताकीद वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेली आहे. मात्र, तरीही दापोडी येथे बिनधास्तपणे काही जणांच्या टोळक्याने वाढदिवस साजरा केल्याचे समोर आले आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, भोसरी पोलीस बर्थडे बॉयचा शोध घेत आहेत.

सोहेलचा वाढदिवस असल्याने मित्र समीर याने सर्व नियोजन केले होते. त्यानुसार ठीक बाराच्या सुमारास सोहेलने काही मित्रांच्या उपस्थित कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी सोहेल आणि समीर हे दोघेही कोयत्याने अक्षरशः केकचे तुकडे करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. केक कापून झाल्यानंतर कोयता दापोडीच्या बस स्थानकात लपवून ठेवण्यात आला. भोसरी पोलिसांनी उशिराने कारवाईला सुरुवात केली. यावेळी समीरला शोधण्यात त्यांना यश आले आहे. इतर मात्र फरार झाले आहेत. सध्या पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.