चक्रीवादळामुळे कलकत्ता विमानतळ 12 तास बंद

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘बुलबुल’ चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीवर सावधगिरीचा इशारा देण्यात आला असून कलकत्ता विमानतळ संध्याकाळी सहा वाजल्यापासून बारा तासांकरिता बंद ठेवण्यात आला आहे. याखेरीज एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

बुलबुल चक्रीवादळामुळे ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊसही पडेल असे भारतीय वेधशाळेने म्हटले आहे. ओडिसा आणि बंगालच्या किनारपट्टीवरील काही भागात पावसाचा तडाखा बसायला सुरुवातही झाली आहे.

या दोन्ही किनारपट्टींवर मध्यरात्री वादळ धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, २० फूट उंचीच्या लाटा समुद्रात उसळतील असा अंदाज असून लोकांनी समुद्र किनाऱ्यावर जावू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मासेमारीच्या बोटी बंद ठेवण्यात आल्या आहेत.

सावध रहा, काळजी घ्या आणि सुरक्षित स्थळी थांबा असे आवाहन पश्चिम बंगाल च्या मुख्य मंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकांना केले आहे.

वादळाचा तडाखा बांगला देशालाही बसेल. तेथील किनारपट्टीवरील एक लाख लोकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

Visit : Policenama.com